कडोंमपाचं रूक्मिणीबाई रूग्णालय डॉक्टरांच्या तुंबड्या भरण्यासाठी?

गरिबांना लुटणारे सरकारी रुग्णालयातील डॉक्टर

Updated: Dec 5, 2018, 07:49 PM IST
कडोंमपाचं रूक्मिणीबाई रूग्णालय डॉक्टरांच्या तुंबड्या भरण्यासाठी? title=

आतीश भोईर, कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेचं रुक्मिणीबाई रूग्णालय गोरगरिबांना उपचार मिळण्यासाठी आहे की डॉक्टरांच्या तुंबड्या भरण्यासाठी... असा सवाल विचारण्याची वेळ यावी असा प्रकार घडलाय आहे. कल्याणमध्ये रूक्मिणीबाई आणि डोंबिवलीत शास्त्रीनगर ही दोन मनपाची रूग्णालयं आहेत. आजूबाजूच्या परिसरातील शेकडो गोरगरीब रूग्ण दररोज पालिकेच्या रूग्णालयात उपचारासाठी येत असतात. मात्र गोरगरीब रूग्णांना डॉक्टरांच्या लुटमारीचा सामना करावा लागत आहे. 

कल्याण पूर्वेच्या सुमन चव्हाण या गरोदर असताना पालिकेच्या रूक्मिणीबाई रूग्णालयात उपचार घेत होत्या. नवव्या महिन्यात प्रसुती वेदना सुरू झाल्यावर त्या तपासणीसाठी गेल्यावर डॉक्टरांनी त्यांना ४ दिवसांनी पुन्हा येण्यास सांगितलं. मात्र त्यानंतर त्यांनी रूग्ण महिलेला सुमंगल या खासगी रूग्णालयात पाठवून महिलेचं सिझेरियन केलं. याचं बिल २५ हजार रूपये झालं. 

चव्हाण कुटुंबीयांनी पैसे जमा करून २० हजार रूपये दिले. मात्र संपूर्ण पैसे भरले नाहीत तर प्रसुतीचे टाके काढण्यात येणार नाही अशी धमकी डॉक्टरांनी दिली. अखेर चव्हाण यांनी डॉ. अविनाश कावळेविरोधात पालिका आयुक्तांकडे तक्रार केली. याची दखल घेऊन आयुक्तांनी डॉ. कावळे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. 

मात्र आपण रूग्णाला दुसऱ्या रूग्णालयात जाण्यास सांगितलं होतं असं सांगत डॉ. कावळे यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला. मात्र घडलेला प्रकार धक्कादायक आहे. महिलेची प्रसुती पालिकेच्या रूग्णालयात होणं अपेक्षित असताना महिलेला खासगी रूग्णालयात का पाठवण्यात आलं याचा शोध घेणं गरजेचं आहे.