एक तासांचे अंतर 15 मिनिटांत पूर्ण होणार, रिंग रोड प्रकल्पामुळं कल्याणकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार

Kalyan Ring Road Project: कल्याण रिंग रोड प्रकल्पामुळं नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. दीड तासांचा प्रवास 15 मिनिटांत पूर्ण होणार आहे.

मानसी क्षीरसागर | Updated: Jul 20, 2024, 01:25 PM IST
 एक तासांचे अंतर 15 मिनिटांत पूर्ण होणार, रिंग रोड प्रकल्पामुळं कल्याणकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार title=

Kalyan Ring Road Project: डोंबिवली ते टिटवाळा या दोन शहरातील अंतर अवघ्या 15 ते 20 मिनिटांत गाठता यावे या साठी कल्याण रिंग रोडचे काम हाती घेण्यात आले आहे. 8 टप्प्यात हे काम पूर्ण करण्यात येणार असून यातील 4 टप्प्यांचे काम पूर्णत्वास आले आहे. 40 रोड जंक्शनचे पूर्ण होताच हा रोड नागरिकांसाठी खुला करण्यात येणार आहे. अलीकडेच झालेल्या एमएमआरडीएच्या बैठकीत कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रिंग रोडच्या उर्वरित टप्प्यांचे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.रिंग रोड प्रकल्पामुळं कल्याणच्या शहरी व ग्रामीण दोन्ही भागांचा विकास होणार आहे. तसंच, प्रवासदेखील सोप्पा होणार आहे.सध्या दुर्गाडी ब्रिज ते एसएच 35-40 रोड जंक्शन हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.  

प्रकल्पाला लागणाऱ्या जमिनीचे भूसंपादन देखील जलदगतीने करण्यात यावे, अशा सूचना खासदार शिंदे यांनी दिल्या आहेत. कल्याणच्या ग्रामीण आणि शहरी भागातील वाहतुकीला अधिक गती प्राप्त होणार आहे. त्यामुळं वाहतुकीच्या दृष्टीने रिंग रोड प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. या प्रकल्पाची आठ टप्प्यात उभारणी करण्यात येणार आहे. सध्या काही प्रमाणात या रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. पुढील प्रकल्प 2026 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. 

चौथ्या टप्प्यात दुर्गाडी पुल ते गांधार पुल, पाचवा टप्पा गांधारी पुल ते मांडा जंक्शन, सहावा टप्पा मांडा जंक्शन ते टिटवाळा जंक्शन आणि सातवा टप्पा टिटवाळा जंक्शन ते एसएच 35-40 रोड जंक्शनचे काम 95 टक्के पूर्ण झाले आहे. तर, उर्वरित काम सुरू आहे.हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. तर, तिसऱ्या टप्प्यातील मोठा गाव पुल ते गोविंदवाडी रोड रस्त्याचे काम सुरू असून ते 2026 पर्यंत पूर्ण होणार आहे. 

पहिल्या टप्प्यात हेदुटणे ते शीळ रोड आणि दुसरा टप्पा शीळ रोड ते मोठागाव पुलपर्यंत जमीनीचे संपादन करण्यात आले आहे.हे काम 2026पर्यंत पूर्ण होणार आहे. सध्या कटाई ते टिटवाळापर्यंत पोहोचण्यासाठी एक तासांचा अवधी लागतो. मात्र, या प्रकल्पामुळं ते अंतर 20 मिनिटांवर पोहोचणार आहे. तसंच, अवजड वाहनेदेखील याच मार्गावरुन जाणार आहेत. त्यामुळं शहरातील रस्त्यावर त्याचा भार येणार नाहीये.

या प्रकल्पाचे फायदे 

कटई ते टिटवाळा हे अंतर कापण्यासाठी एक तासांचा अवधी लागतो. मात्र, या नव्या मार्गामुळं हे अंतर अवघ्या 15 ते 20 मिनिटांत कापण्यात येणार आहे. या मार्गावर अवजड वाहनांनाही परवानगी दिली जाणार आहेत. त्यामुळं शहरात वाहतुक कोंडी होणार नाही. या प्रकल्पामुळं शहर व ग्रामीण भागातील वाहतुकीस चालना मिळेल.