याने ट्रेन चालवलीच कशी? व्हिडिओ दाखवून गंडवणाऱ्याचा कारनामा पाहून पोलिसही चक्रावले

आरोपीने रेल्वे चालवताना व्हिडिओ कसा बनवला ? हा व्हिडिओ खरा आहे का ? याचा तपास देखील पोलिस करत आहेत.

Updated: Nov 8, 2022, 08:23 PM IST
याने ट्रेन चालवलीच कशी? व्हिडिओ दाखवून गंडवणाऱ्याचा कारनामा पाहून पोलिसही चक्रावले title=

आतीष भोईर, झी मीडिया, कल्याण : पैसै कमवण्यासाठी लोकांची फसवणुक करणाऱ्या एका ठगाला  कल्याणच्या कोळशेवाडी पोलिसांनी(Kolshewadi Police of Kalyan) बेड्या ठोकल्या आहेत. हा स्वत:चे लोकल ट्रेन चावतानाचे व्हिडिओ दाखवून लोकांना गंडवत( Fraud) होता. अखेरीस त्याचा हा कारनामा उघड झाला. मात्र, त्याचा हा व्हिडिओ पाहून याने ट्रेन चालवलीच कशी? असा प्रश्न पोलिसांना पडला. आरोपीने अनेक लोकांकडून लाखो रुपये उकळले आहेत. 
रेल्वेत नोकरी(Jobs in Railways) लावण्याचे आमिष दाखवत हा गरजवंताना लाखोंचा गंडा घालत होता. या भामट्याला कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी सापळा रचत अटक केली आहे. उमाशंकर बर्मा असे या आरोपीचे नाव आहे.

रेल्वे मध्ये मोटरमन असल्याची बतावणी

या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे उमाशंकर रेल्वे चालवत असल्याचा व्हिडियो लोकांना दाखवत आपल्या जाळ्यात ओढत होता. आपण रेल्वे मध्ये मोटरमन असल्याची बतावणी तो करत होता.अखेर उमाशंकरचे बिंग कोळशेवाडी पोलिसांनी फोडले आहे.  त्याने आणखी काही जणांची फसवणूक केल्याचा संशय पोलिसांना आहे. बर्मासह रणजितकुमार शर्मा आणि रवी सोनी या त्याच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

कल्याण नांदीवली भागात राहणाऱ्या गजेंद्र जैन यांना देखील बर्मा याने गंडा घातला. जैन यांना त्याने त्यांच्या पत्नीला रेल्वेत नोकरी लावतो असे सांगितले. यासाठी त्याने जैन यांच्याकडून तब्बल 21 लाख 60 हजार रुपये उकळले. प्रत्यक्षात मात्र तो नोकरीला लावण्यात टाळाटाळ करता असल्याचे पाहताच गजेंद्र यांनी कल्याण कोळशेवाडी पोलीस ठाण्यात फसवणूक झाल्या प्रकरणी तक्रार नोंदवली. दरम्यान, जैन यांनी वर्मा याला कल्याण रेल्वे स्टेशनजवळ भेटायला बोलावले. यावेळी पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. 

आता या प्रकरणी कोळशेवाडी पोलिसांनी उमाशंकर बर्मा विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. तसेच या रॅकेट मध्ये जे लोक आहेत त्यांचा शोध घेत आणखी किती लोकांना त्यांनी फसवले आहे याचा पोलिस तपास करत आहेत.
उमाशंकरने रेल्वे चालवताना व्हिडिओ कसा बनवला ? हा व्हिडिओ खरा आहे का ? याचा तपास देखील पोलिस करत आहेत.