जालना : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्धल केलेल्या बेताल वक्तव्यामुळे कृषिमंत्री अब्दुल सत्तार ( abdul sattar) चांगलेच अडचणीत आले आहेत. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून (NCP) जोरदार निषेध केला जात आहे. अब्दुल सत्तारांची दिलगीरी नको. सत्तारांचे कपडे फाडणाऱ्याला 10 लाखांचं बक्षीस देणार असल्याचं जालन्यातील राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे कृषिमंत्री अब्दुल सत्तार आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्ष (Abdul sattar vs NCP) वाढण्याची शक्यता आहे.
'अब्दुल सत्तारांचे कपडे फाडणा-याला 10 लाखांचं बक्षीस' असं राष्ट्रवादीच्या जालन्यातील महिला पदाधिकारी रेखा तौर यांनी घोषणा केलीये. रेखा तौर यांच्या विधानामुळे वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार यांना मुख्यमंत्र्यांकडून देखील शेवटची वॉर्निंग देण्यात आली आहे. यापुढे कुठल्याही वादात सत्तारांचे नाव आल्यास त्यांचे मंत्रीपद अडचणीत येऊ शकते. अब्दुल सत्तार यांना माध्यमांपासूनही लांबच राहण्याचा मुख्यमंत्री यांनी सल्ला दिल्याची सूत्रांची माहिती आहे. यापुढे माध्यमांना पक्षातील मुख्य नेते आणि प्रवक्ते हेच प्रतिक्रिया देतील असं देखील सांगण्यात आलं आहे.
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी अपशब्द उच्चारल्यानंतर आणि त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसनं जोरदार आंदोलन केल्यानंतर आज पहिल्यांदाच सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. सत्तेवरील लोकांकडून अशी वक्तव्ये अपेक्षित नाहीत, अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्राची सुसंस्कृत परंपरा जपूया, असं आवाहनही त्यांनी केलं.