लॉकडाऊन : कल्याण - डोंबिवलीला जोडणाऱ्या पत्रीपुलाचे काम करण्याची परवानगी

कल्याण डोंबिवली यांना जोडणाऱ्या पत्रीपुलाचे काम सुरू करण्यास ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे.  

Updated: Apr 11, 2020, 11:33 AM IST
लॉकडाऊन : कल्याण - डोंबिवलीला जोडणाऱ्या पत्रीपुलाचे काम करण्याची परवानगी title=

ठाणे : कल्याण डोंबिवली यांना जोडणाऱ्या पत्रीपुलाचे काम सुरू करण्यास ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. गेल्या पाच दिवसांपासून दुसऱ्या पत्रीपुलाचं काम सुरु करण्यात आले आहे. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करत पुलाचं काम सुरू करण्यात आले आहे. लॉकडाऊन संपेपर्यंत नवा पत्रीपूल उभारण्याचं उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.

कल्याणमधील वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असलेला पत्री पूल धोकादायक झाला होता. हा पूल केव्हाही पडू शकतो. त्यामुळे या पुलाचे काम त्वरीत करण्यात यावे अशी मागणी करण्यात येत होती.  सुरक्षा ऑडिटमध्ये हा पूल धोकादायक असल्याची माहिती समोर आल्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. तसेत तो लवकर पाडण्याच्या सूचना मध्य रेल्वेने कल्याण-डोंबिवली महापालिकेला दिल्या होत्या. आज जिल्हाधिकाऱ्यांनी लाकडाऊन दरम्यानच्या काळात हा पूल पूर्ण करण्याची सूचना देताना काम सुरु करण्यास सांगितले.

मध्य रेल्वे, आयआयटी आणि कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे २० जुलै २०१९ मध्ये पत्री पुलाचे सुरक्षा ऑडिट करण्यात आले होते. त्यानंतर पादचारी किंवा वाहनांच्या वाहतुकीसाठी हा पूल सुरक्षित नाही, असा अहवाल देण्यात आला होता. या मार्गावरील वाहतूक तातडीने बंद करण्याचे आदेश मध्य रेल्वेने कल्याण-डोंबिवली महापालिकेला दिले होते.

कोरोनाचे संकट असल्याने लॉकडाऊन आणि संचाबंदी लागू करण्यात आली आहे. याच संधीचा लाभ उठविण्याच्या दृष्टीकोणातून तसेच कोणाला त्रास होऊ नये म्हणून पुलाच्या कामास परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, कल्याण पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा पत्री पूल हा पादचारी आणि वाहनांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे लॉकडाऊन दरम्यानच्या काळात पूल पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.