'शिंदेंनी भ्रष्टाचाराचे किती पैसे खाल्ले विचारा, माझे कोट्यवधी रुपये..'; BJP MLA कडून CM च्या राजीनाम्याची मागणी

Kalyan Crime Shooting BJP MLA Ganpat Gaikwad: शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यावर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरिक्षकासमोरच गोळीबार केल्यानंतर भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 3, 2024, 09:01 AM IST
'शिंदेंनी भ्रष्टाचाराचे किती पैसे खाल्ले विचारा, माझे कोट्यवधी रुपये..'; BJP MLA कडून CM च्या राजीनाम्याची मागणी title=
मुख्यमंत्री शिंदेवर गंभीर आरोप

Kalyan Crime Shooting BJP MLA Ganpat Gaikwad: कल्याण पूर्व मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप केले आहेत. अगदी आपले कोट्यवधी रुपये एकनाथ शिंदेंकडे असल्याच्या दाव्यापासून ते शिंदेंच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा घेण्याची मागणी गणपत गायकवाड यांनी केली आहे. उल्हासनगरमधील हिललाईन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अनिल जगताप यांच्यासमोरच गणपत गायकवाड यांनी शिंदे गटातील माजी नगरसेवक आणि जिल्हा प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केल्यानंतर 'झी 24 तास'शी बोलताना हा धक्कादायक आरोप केला आहे. (गणपत गायकवाडांनी केलेल्या गोळीबार प्रकरणाचे लाईव्ह अपडेट्स पाहण्यासाठी येथे क्लिक करा.)

महाराष्ट्रात गुन्हेगारांचं राज्य घडवण्याचा शिंदेंचा प्रयत्न

भाजपा आणि शिंदे गटाची राज्यात युती असतानाच दोन्ही गटातील नेते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये थेट गोळीबार करण्यापर्यंत वाद झाल्याने राज्यभरामध्ये या घटनेची चर्चा आहे. गोळीबार आपणच केल्यची कबुली दिल्यानंतर आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यंत्री एकनाथ शिंदे राज्यात गुन्हेगारी पसरवत असल्याचा आरोप केला. "पोलीस स्टेशनच्या दरवाजामध्ये माझ्या मुलाला धक्काबुक्की केली. माझ्या जागेचा या लोकांनी जबरदस्तीने कब्जा घेतला. मला मनस्ताप झाला आणि म्हणून मी फायरिंग केली," असं गणपत गायकवाड यांनी म्हटलं आहे. तसेच पुढे बोलताना गणपत गायकवाड यांनी, "एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारांचं राज्य घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील तर महाराष्ट्रभर फक्त गुन्हेगारच पैदा होतील. आमच्यासारख्या चांगल्या माणसाला आज एकनाथ शिंदेंनी गुन्हेगार बनवलं आहे," असं म्हणत थेट मुख्यमंत्र्यांवर टीका केली.

शिंदेंकडे माझे करोडो रुपये

तुमची युती आहे, असं म्हणत आमदार गायकवाड यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला असता प्रश्न पूर्ण होण्याआधीच, "शिंदेसाहेबांना उद्धवसाहेबांशी गद्दारी केली. ते भाजपाबरोबरही गद्दारी करणार आहेत," असं गणपत गायकवाड म्हणाले. "(शिंदेंनी) माझ्यासोबत सुद्धा गद्दारी केली. एकनाथ शिंदेंकडे माझे करोडो रुपये बाकी आहे. शिंदे साहेब देवाला मानत असतील तर त्यांनी शपथ घेऊ सांगावं की गणपत गायकवाडचे किती पैसे बाकी आहेत. गणपत गायकवाडचे एवढे पैसे खाऊन सुद्धा गणपत गायकवाडविरुद्धच काम करत आहेत," असं आमदार गायकवाड म्हणाले. "एकनाथ शिंदेंनी दुसऱ्यांचं आयुष्य खराब करायला घेतलं आहे," असंही गणपत गायकवाड म्हणाले. "मी वरिष्ठांना बऱ्याचदा सांगितलं होतं की हे लोक वारंवार माझा अपमान करतात. माझा निधी वापरला जातो त्या ठिकाणी खासदार श्रीकांत शिंदे स्वत:चे बोर्ड लावतात जबरदस्तीने. मी वेळोवेळी सांगितलं आहे. मी ज्या ज्या ठिकाणी राज्य शासनाचा निधी आणला त्या ठिकाणी श्रीकांत शिंदेंनी आपले बोर्ड लावले. माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. एकनाथ शिंदेंनी त्या भ्रष्टाचारामध्ये किती पैसे खाल्ले हे त्यांनी सांगावे," असंही गणपत गायकवाड यांनी सांगितलं.

नक्की वाचा >> '..तर बाप म्हणून जगण्यात अर्थ नाही'; फडणवीसांबद्दल बोलताना गोळीबार करणाऱ्या BJP आमदाराचं विधान

शिंदेंचा राजीनामा घ्या

गणपत गायकवाड यांनी पुढे बोलताना जे काही कोर्ट ठरवेल ते आपल्याला मान्य असेल पण एकनाथ शिंदेंचा राजीनामा घेतला पाहिजे असंही म्हटलं. "पुढे कोर्टाचा निर्णय असेल तो मला मान्य आहे. मात्र महाराष्ट्रात अशी गुन्हेगारी बंद करायची असेल तर एकनाथ शिंदेंचा राजीनामा घेतला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे," असं गणपत गायकवाड 'झी 24 तास'ला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये म्हटले.

थेट मोदींचा उल्लेख

तुम्ही फडणवीस यांच्याकडे याबद्दल तक्रार केलेली का? त्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे याबद्दल आपलं काही म्हणणं मांडणार आहात का? असा प्रश्न गायकवाड यांना विचारण्यात आला. "पक्षश्रेष्ठी जो निर्णय घ्यायचाय तो घेतील. माझा निर्णय असा आहे, की एकनाथ शिंदेंनी गुन्हेगारी घडवून महाराष्ट्राची वाट लावायला घेतली आहे. महाराष्ट्रामध्ये चांगलं ठेवायचं असेल तर एकनाथ शिंदेंचा राजीनामा घेतला पाहिजे. हीच माझी देवेनभाऊंना (देवेंद्र फडणवीसांना) पण आणि मोदीसाहेबांना पण," असं गणपत गायकवाड म्हणाले. "मी पक्षाच्या बैठकीमध्ये वेळोवेळी सांगितलं होतं की जिथे जिथे माझ्या आमदार निधीमधून पैसे वापरले जातात तिथे श्रीकांत शिंदे आपला बोर्ड लावतात. मी ग्रंथालय सुरु केलं होतं त्याचं साध उदघाटनही झालं नाही. तिथे रंग मारुन श्रीकांत शिंदेंनी आपला बोर्ड लावला. किती खालच्या स्तराला जाऊन हे लोक भाजपाला संपवण्याचं काम करत आहेत," असा आरोप गणपत गायकवाड यांनी केला आहे.

जनता मला चांगल्याप्रकारे ओळखते

असे वाद होत असतील तर 2024 च्या निवडणुकीत तुम्ही कसे जनतेला समोरं जाणार? या प्रश्नावर बोलताना, "माझ्या जनतेला माहिती आहे की मी गुन्हेगार नाही. मी आत्मसंरक्षणार्थ गोळीबार केला आहे. जनता मला चांगल्याप्रकारे ओळखते. जनतेचा माझ्यावर विश्वास आहे आणि यापुढेही राहील," असं गणपत गायकवाड म्हणाले.