आतिष भोईर, झी मीडिया कल्याण : कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर चौघांनी सामूहिक बलात्कार (Gang Rape) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी कोळशेवाडी पोलिसांनी (Kolshewadi Police) चारही आरोपींना अटक केली आहे. कल्याणमध्ये राहणारी 15 वर्षीय पीडित अल्पवयीन मुलीचं अपहरण झाल्याची तक्रार पीडितेच्या पालकांनी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात केली होती. त्यानंतर या मुलीचा शोध घेत असताना ही मुलगी कल्याण स्टेशन परिसरात पोलिसांना आढळून आली. पोलिसांनी तिची चौकशी केल्यानंतर चौघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली.
आरोपींनी बोलावलं भेटायला
इंस्टाग्रामवर (Instagram) पीडित मुलीची एका मुलाबरोबर ओळख झाली. त्यानंतर दोघांची मैत्री झाली आणि ते एकमेकांशी चॅट करु लागले. घटनेच्या दिवशी त्या मुलीने पीडित मुलीला भेटायला बोलावलं. माझी प्रियसी तुझ्यावर संशय घेत असून तिला भेटून आपले प्रेमसंबंध नाहीत हे सांग असं आरोपी मुलाने पीडित मुलीला सांगितलं. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन मुलगी आरोपी मुलाला भेटायला गेली. आरोपी मुलगा पीडित मुलीला घेऊन उल्हासनगरला गेला आणि तिथे तिच्यावर अत्याचार केला.
दुसऱ्या दिवशी त्याने तिला धमकी देत पुन्हा बोलावून घेतलं आणि एका मित्राच्या घरी नेऊन तिच्यावर पुन्हा अत्याचार केला. त्यानंतर त्याच्या आणखी तीन मित्रांनी मुलीवर सामूहिक अत्याचार केला. मुलीने घडलेल्या प्रकाराची पोलिसांत तक्रार केल्यानंतर पोलिसांनी चारही ओरीपांना अटक केली. यात एका अल्पवयीन आरोपीचा समावेश आहे. आरोपींना न्यायालयात हजर केलं असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सोशल मीडियावर मैत्री करताना काळजी घ्या
सध्याच्या इंटरनेटच्या युगात सोशल मीडियामुळे मैत्री करणं खूप सोपं झालं आहे. कुटुंबिय आणि नातेवाईकांपेक्षा सोशल मीडियावरचे मित्र-मैत्रिणी जवळचे वाटू लागले आहेत. पण अनेकवेळा मैत्रीमध्ये गफलत होते आणि चुकीच्या व्यक्तीबरोबर मैत्री केल्याची किमत चुकवावी लागते. त्यामुळे मित्र-मैत्रीण निवडताना काळजी घेणं आवश्यक आहे. वाईट मानसिकता असलेल्या व्यक्तीबरोबर मैत्री करून मनस्ताप ओढावू शकतो.
सोशल मीडियावर ओळख झालेल्या मित्र-मैत्रीणींना आपल्या खासगी आयुष्यातील गोष्टी चुकूनही सांगू नका. कारण यामुळे तुमचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो. सोशल मीडियावर ओळख झालेल्या मित्र किंवा मैत्रिणीला भेटायला जाताना आपल्या कुटुंबियांना त्याबाबत माहिती द्या. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवताना दहावेळा विचार करा.