Job Interview Tips: चांगल्या पगाराची नोकरी मिळावी असे प्रत्येकाला वाटते. यासाठी अनेकजण तशा प्रकारच्या नोकरी शोधत असतात. दरम्यान नोकरी मिळविण्यासाठी मुलाखतीचा टप्पा पार करणे महत्वाचे असते. आजकाल प्रत्येक क्षेत्रात आपल्याला जोरदार स्पर्धा पाहायला मिळत आहे. त्यामुळे खासगी क्षेत्रात करिअर ग्रोथ आणि चांगला पगार मिळवणे फार सोपे नाही. मात्र, कितीही अडचणी आल्या, तरी प्रत्येकाला आपापल्या करिअरमध्ये पुढे जायचे असते.
तुम्ही सध्याच्या जॉब प्रोफाईलवर खूश नसाल आणि नवीन जॉबच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी काही महत्त्वाच्या मुलाखती टिप्स आहेत.
नोकरीची मुलाखत कशी द्यावी, मुलाखतीत काय परिधान करावे, कोणत्या प्रश्नांची तयारी करावी... अशा प्रश्नांची उत्तरे तुम्हाला इंटरनेटवर सहज मिळतील. पण नोकरीच्या मुलाखतीदरम्यान काय बोलावे आणि काय बोलू नये हे माहिती असणे खूप महत्वाचे असते.
मुलाखतीदरम्यान तुमची सध्याची कंपनी, बॉस/वरिष्ठ यांच्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारले जातील. अशावेळी त्यांच्याबद्दल नकारात्मक गोष्टी बोलू नका. सध्याच्या प्रोफाईलमध्ये तुम्हाला त्रास होत असला, तरी मुलाखतीदरम्यान त्याचा उल्लेख करु नका. मुलाखतीत नेहमी सकारात्मक राहिल्याने समोरच्या व्यक्तीवर चांगला परिणाम होतो आणि नोकरी मिळण्याची हमी वाढते.
मुलाखतकाराने विचारलेले प्रश्न नीट ऐकून घ्या. त्यांचा प्रश्न पूर्ण होण्यापूर्वी तुमचा मुद्दा सांगण्याची घाई करू नका. यामुळे तुमची छबी खराब होईल. तुम्ही बोलण्यात चंचल राहिलात तर चांगले टिम लीडर म्हणून तुम्ही अयोग्य ठराल. कारण तुम्ही कोणाचेही ऐकू शकत नाही, असे त्यातून दिसू शकते. एक चांगला श्रोता असणे तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल.
मुलाखती दरम्यान स्वतःच्या कामाबद्दल, अनुभवाबद्दल सांगण्याचे अनेक प्रसंग येतील. त्यावेळी बोलण्यावर नियंत्रण ठेवा. बोलण्याच्या ओघात स्वत:ची प्रशंसा करणे टाळा. जे आवश्यक आहे किंवा जेवढे विचारले जाते तेवढेच बोला. संपूर्ण मुलाखतीत फक्त स्वत:ची स्तुती करू नका. तुमच्याकडे असलेल्या कौशल्यांचा कंपनीला कसा फायदा होऊ शकतो, हे मुलाखत घेणाऱ्याला पटवून द्या.