योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्नी संयोगिताराजेंना नाशिकच्या काळाराम मंदिरात वेदोक्त मंत्र म्हणण्यास महंतांनी मज्जाव केला. यावरुनच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड चांगलेच संतापले आहेत. काळाराम मंदिरात प्रभू श्रीरामाच्या चरणी संविधानाची प्रत ठेवत जितेंद्र आव्हाडांनी घडल्या प्रकाराचा निषेध हा सनातन धर्म कुठून आला अस म्हणत त्यांनी सध्या धर्मा-धर्मात, जाती-जातीत कटूता निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला. तर, संयोगिताराजेंनी घेतलेल्या परखड भूमिकेचा सार्थ अभिमान आहे अशी भूमिका संभाजीराजे छत्रपतींनी घेतली.
बाबासाहेब आंबेडकरांनी प्रवेशाचा सत्याग्रह केलेल्या काळाराम मंदिरात जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांचा विरोध झुगारून काळाराम मंदिरात प्रवेश केला. त्यावेळी त्यांच्या हातात संविधानाची प्रत होती. यावेळी पोलिसांनी केवळ 15 लोकांना त्यांच्यासोबत येण्याची परवानगी दिली होती. आव्हाड यांनी काळाराम मंदिराच्या गाभार्यात जाऊन काळामाच्या मूर्ती समोर दोन मिनिटं मौन बाळगले यावेळी महाराष्ट्रात सामाजिक शांतता निर्माण होवो अशी इच्छा त्यांनी काळारामसमोर व्यक्त केली.
नाशिकच्या काळाराम मंदिरात छत्रपती संभाजीराजे यांच्या पत्नी संयोगिता राजेंना वेदोक्त मंत्रोच्चार करण्यास महंतांनीच विरोध केला आहे. छत्रपतींनी जी मंदिर वाचवली तिथे छत्रपतींना शिकवण्याचं धाडस करु नका या शब्दांत संयोगिताराजेंनी महंतांना सुनावले. एवढंच नाही तर महंतांना झुगारत त्यांनी मंदिरात महामृत्यूंजय मंत्राचा जपही केला. संयोगिता राजे काळाराम मंदिरात पुजेसाठी गेल्या होत्या. तेव्हा पुजेदरम्यान महंतांनी संयोगिताराजेंना वेदोक्त मंत्राचा अधिकार कसा नाही हे सांगण्याचा प्रयत्न केला. तेव्हा संयोगिता राजेंनी हा विरोध झुगारत रामरक्षासह महामृत्यूंजय जपही केला.
122 वर्षांनंतर पुन्हा एकदा वेदोक्त प्रकरण चर्चेत आलंय. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना वेदोक्त मंत्र म्हणण्यास रोखण्यात आलं होतं. त्याविरोधात शाहू महाराजांनी मोठा लढाही दिला. काळ बदलला, आपण 21 व्या शतकात आलो. मात्र, परिस्थिती आणि मानसिकता अजूनही तशीच आहे.. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्नी संयोगिताराजे छत्रपती यांना वेदोक्त मंत्र म्हणण्यापासून रोखण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय. नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरातच हा धक्कादायक प्रकार घडल्याचं स्वत: संयोगिताराजे यांनी आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले.
नाशिकच्या काळा राम मंदिरातील तथाकथित महंतांनी माझ्या पूजेसाठी पुराणातील मंत्र म्हणण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या वारशामुळे मी ठामपणे विरोध केला. अनेक कारणे देऊन त्यांनी मला वेदोक्त मंत्राचा अधिकार कसा नाही हे सांगायचा प्रयत्न केला. शेवटी मी विचारले की ज्या मंदिरांमध्ये तुम्ही आजच्या काळातही जे नियम लावत आहात ती मंदिरे वाचविली कोणी? छत्रपतींनी वाचविली! मग छत्रपतींना शिकवण्याचे धाडस करू नका. तरीही मी महामृत्युंजय मंत्र जप का केला म्हणून त्यांनी प्रश्न केलाच. तेव्हा मात्र परमेश्वराच्या लेकराला, आपल्या ईश्वराला भेटायला आणि त्याची स्तुती करायला तुमच्या मध्यस्थीची गरजच नाही, असे सुनावले. त्यानंतर मी तिथेच रामरक्षेचं पठण केलं. शाहू महाराजांसोबत जे घडलं तेच संयोगिताराजेंसोबत घडल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे काळ बदलला पण मानसिकता कधी बदलणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.