विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : मराठवाड्यात पाऊस नसतानाही जायकवाडी धरणाचा पाणीसाठा आज ८८ टक्क्यांवर पोहचलाय. या पाण्याचा औरंगाबाद, जालना, बीड या तीन जिल्ह्यातील काही तालुक्यांना आणि गावांना आधार मिळालाय. मात्र, उर्वरित मराठवाडा अजूनही कोरडाठाक असल्यानं मराठवाड्याची चिंताही अधिक वाढली आहे.
अगदी भुरभूर पाऊस असतानाही मराठवाड्यातील जायकवाडी धरण भरत आलं आहे. नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे जायकवाडी भरलं. दुष्काळग्रस्त मराठवाड्यातल्या ४५ लाख लोकांना याचा वापर करत येणार आहे.
अर्धा पावसाळा संपत आला तरी मराठवाड्यावर वरुणराजानं कृपा केलेली नाही. सरासरी पन्नास टक्केही पाऊस मराठवाड्यात झालेला नाही. त्यात मराठवाड्यातल्या मोठ्या धरणांपैकी सात धरणांमध्ये पाण्याचा ठणठणाट आहे.
सध्या मांजरा, माजलगाव, तेरणा, सीना कोळेगाव, दुधना, येलदरी आणि सिद्धेश्वर धरणात शून्य पाणी आहे.
मराठवाड्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग सुरू करण्यात आला आहे. त्याला अद्यापपर्यंत यश आलेलं दिसत नाही. त्यामुळं दुष्काळाची भीती आणखी गडद होत चाललीय. त्यात एकच दिलासा किमान मराठवाड्यातील काही गावांना जायकवाडीतील वाढलेल्या पाणीसाठ्यानं दिलासा दिला आहे.