सातारा : जम्मू काश्मीरमध्ये नेवसारा सेक्टरमध्ये सातारा जिल्ह्यातील जवान शहीद झालेत. कराड तालुक्यातल्या मुंडे गावातील संदीप रघुनाथ सावंत यांना वीरमरण आले. संदीप सावंत सहा मराठा बटालियनमध्ये होते. शहीद संदीप सावंत यांचे पार्थिव उद्या त्यांच्या गावी आणले जाणार आहे. नववर्षाच्या पहाटे संदीप सावंत यांच्या गस्ती पथकाला नियंत्रण रेषेजवळ जंगलात हालचाली दिसल्या. यावेळी मात्र दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात संदीप सावंत आणि गोरखा रायफल्सचे अर्जुन थापा या दोघांना वीरमरण आले.
संदीप सावंत २८ सप्टेंबर २०११ रोजी सैन्यात भरती झाले होते. त्यांचे लग्नही झाले आहे. १२ वीपर्यंतचं शिक्षण पूर्ण करुन १८ मराठा बटालियनमध्ये सहभागी झाले होते. संदीप सावंत यांनी भरतीनंतर राजस्थान आणि जम्मू काश्मीर येथे सेवा बजावली होती. संदीप सावंत शहीद झाल्याचे वृत्त समजताच त्यांच्या गावावर शोककळा पसरली आहे. गुरुवारी शहीद संदीप सावंत यांचे पार्थिव पुण्यात आणले जाईल. तिथून त्यांच्या मूळ गावी नेण्यात येईल अशीही माहिती समोर आली आहे.
संदीप सावंत आणि रायफलमॅन अर्जुन थापा या दोघांनाही दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आले. या दोघांनी दाखवलेले शौर्य देश कधीही विसरणार नाही. त्यांच्या बलिदानाची देशाला कायम जाणीव राहील, अशा शब्दात ले. कर्नल देवेंदर आनंद यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
दरम्यान, नौशेरा परिसरात ही घटना घडल्यानंतर संपूर्ण परिसरात नाकेबंदी करण्यात आली. शोधमोहीम सुरु असून लपून बसलेल्या दहशतवाद्यांना शोधण्याचे काम सुरु आहे. काही दिवसांपूर्वी नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले होते. यावेळी भारताने पाकिस्तानला प्रत्युत्तर दिले. मात्र, पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहेत.