जातपंचायतीचं भयाण वास्तव : आई-मुलाच्या मृतदेहालाही वाळीत टाकलं!

जातपंचायतीनं २५ वर्षांपूर्वी ठोठावलेला २० हजार रुपयांचा दंड न भरल्याने कोमटी जात पंचायतीच्या अध्यक्षाने जातीतील नागरिकांना एका माय-लेकरांच्या अंत्ययात्रेत सहभागी होण्यास मज्जाव केला.

Updated: Aug 18, 2017, 10:14 AM IST
जातपंचायतीचं भयाण वास्तव : आई-मुलाच्या मृतदेहालाही वाळीत टाकलं! title=

औरंगाबाद : जातपंचायतीनं २५ वर्षांपूर्वी ठोठावलेला २० हजार रुपयांचा दंड न भरल्याने कोमटी जात पंचायतीच्या अध्यक्षाने जातीतील नागरिकांना एका माय-लेकरांच्या अंत्ययात्रेत सहभागी होण्यास मज्जाव केला.

आदेश न मानल्यास जातीतून बेदखल करण्याची धमकी देण्यात आल्याने परिसरातील अन्य जाती-धर्माच्या लोकांनी अंत्यसंस्कार उरकल्याची धक्कादायक घटना औरंगाबाद शहरात गुरूवारी घडली.

आई-मुलाची मृत्यूनंतरही फरफट

कोमटी समाजातील ४५ वर्षीय संजय पांडुरंग कावेटी हे पत्नी आणि तीन मुलांसह दलालवाडीत राहत होते. ते कपड्याच्या नाड्या विकण्याचा व्यवसाय करत होते. बुधवारी सांयकाळी त्यांचे हृद्यविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. 

संजय यांची आई पेंटम्मा पांडुरंग कावेटी परभणीला राहायच्या. संजयच्या मृत्यूची माहिती आईला देण्यात आली. या धक्क्याने त्यांचाही मृत्यू झाला. 

सकाळी नातेवाईक आईचा मृतदेह औरंगाबादेत घेऊन आले. आई आणि मुलाचे एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्याचे ठरले. मात्र, जात पंचायतीच्या निर्णयामुळे काल संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

दुसऱ्या जातीतील लोकांनी केले अंत्यसंस्कार

गांधीनगरचे भाजप कायर्कर्ते अजय चावरिया यांनी पुढाकार घेऊन अंत्यसंस्कार करून घेतले. औरंगाबाद शहरातील दलालवाडी, नवाबपुरा, बेगमपुरा, कुंवारफल्ली भागात या समाजाची २२५ ते २५० घरे आहेत. कावेटी यांच्या घरात दोन मृतदेह असताना कोमटी जात पंचायतीचे अध्यक्ष सदानंद चपलालू यांनी मज्जाव केल्यामुळे जातीतील एकही सदस्य तिथं फिरकलादेखील नाही. 

जात पंचायतीने संजय कावेटी यांना २० हजारांचा दंड ठोठावला होता. त्यांनी तो भरला नव्हता. तो दंड भरा आणि अंत्ययात्रा घेऊन घरासमोर या, माफी मागा तरच लोकांना सहभागी होता येईल, असं बजावले. ते कबूल असल्याचे मान्य करण्यासाठी जातीच्या लोकांच्या हाताचे ठसेही त्यांनी घेतले होते.

लाज वाटायला हवी...

धक्कादायक म्हणजे, ज्या गोष्टीची लाज वाटायला हवी त्याच गोष्टींचा उदोउदो केला जातोय. जिथं माणुसकीही शरमेनं मान खाली घालेल अशा पद्धतीनं एखाद्या जिवंत व्यक्तीला वागणूक देण्याच्या घटना आत्तापर्यंत अनेकदा समोर आल्या... इथं तर 'जाती'तल्या लोकांनी मेलेल्या व्यक्तींनाही सोडलं नाही.