'गोळीबार व लाठीमार ही फडणवीसांची शस्त्रे'; ठाकरे गटाचा हल्लाबोल; शिंदे-पवारांनाही केलं लक्ष्य

Jalna Maratha Reservation Protest: "मुख्यमंत्री किंवा गृहमंत्र्यांचा आदेश असल्याशिवाय मराठा आंदोलकांवर निर्घृण हल्ला होऊच शकत नाही. त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी ज्यांचे आदेश पाळले त्या मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना शासन करणार का?"

स्वप्निल घंगाळे | Updated: Sep 5, 2023, 09:58 AM IST
'गोळीबार व लाठीमार ही फडणवीसांची शस्त्रे'; ठाकरे गटाचा हल्लाबोल; शिंदे-पवारांनाही केलं लक्ष्य title=
कठोर शब्दांमध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर साधला निशाणा

Jalna Maratha Reservation Protest: जालन्यामध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर झालेल्या लाठी चार्ज प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन मराठा समाजाला आरक्षण मिळेल अशी ग्वाही दिली आहे. मात्र यानंतरही मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेतलेलं नाही. दुसरीकडे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या गटाने जालन्याच्या पोलीस अधीक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठवून त्यांचा बळी घेतला पण निर्घृण हल्ला करण्याचे आदेश देणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर, गृहमंत्र्यावर कारवाई होणार का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या 'सामना'मधून या प्रकरणावरुन सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना शासन करणार का?

"महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असतानाच जालन्यात पेटलेल्या मराठा आंदोलनाचा भडका जास्तच वाढला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे-पाटील उपोषणास बसले व शांततेत सुरू असलेल्या आंदोलनावर शिंदे-फडणवीस-पवारांच्या सरकारने अमानुष लाठीमार केला, बंदुका चालवल्या. शिंदे-फडणवीस-अजित पवार सोडून सगळेच नेते जरांगे-पाटलांच्या गावात जाऊन आले. सारवासारवी म्हणून सरकारने आता जालन्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांचा बळी घेतला आहे. मात्र मुख्यमंत्री किंवा गृहमंत्र्यांचा आदेश असल्याशिवाय मराठा आंदोलकांवर निर्घृण हल्ला होऊच शकत नाही. त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी ज्यांचे आदेश पाळले त्या मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना शासन करणार का?" असा प्रश्न उद्धव ठाकरे गटाने विचारला आहे.

खोकेवाल्या सरकारपुढे तो झुकायला तयार नाही

"नागपूरच्या चाणक्यांचे जामनेरी चाणक्य गिरीश महाजन हे मनोज जरांगे-पाटलांना भेटायला गेले. मराठा आरक्षणासाठी सरकार काय काय करते आहे ते त्यांनी सांगितले, पण जरांगे-पाटील यांनी खिशातून बंदुकीची गोळी काढून महाजनांच्या हाती दिली व सांगितले, ‘‘तुमच्या सरकारने मराठा आरक्षणासाठी हे केले. आम्ही आरक्षण मागितले. सरकारने बंदुकीची गोळी दिली.’’ तसेच ‘‘मराठा आरक्षणाचा सरकारी आदेश म्हणजे ‘जीआर’ हातात पडत नाही तोवर आंदोलन मागे घेणार नाही,’’ असा दम जरांगे-पाटलांनी भरला. जालन्याच्या आंतरवाली गावात एक सर्वसामान्य कार्यकर्ता जिद्दीने त्याच्या समाजासाठी उपोषणाला बसला आहे. त्याने प्राण पणास लावले आहेत व खोकेवाल्या सरकारपुढे तो झुकायला तयार नाही," असं म्हणत ठाकरे गटाने मनोज जरांगेंचं कौतुक केलं आहे.

नितेश राणेंनी केलेल्या विधानाची करुन दिली आठवण

"दिल्ली विधानसभेवर ताबा मिळविण्यासाठी मोदी सरकारने एका रात्रीत अध्यादेश आणला. संसदेत घटना दुरुस्ती करून दिल्लीतील लोकशाही मोडून केजरीवाल सरकारचे सर्व अधिकार हातात घेतले. मग मराठा आरक्षणासाठीही केंद्राने आरक्षणाची मर्यादा वाढवून प्रश्न सोडवायला हवा. कोणाच्याही ताटातले काढून न घेता सर्वमान्य होईल असा निर्णय घेतला पाहिजे, पण भाजपाचे आमदार नितेश राणे काँग्रेस पक्षात असताना जे म्हणाले तेच खरे, ‘‘फडणवीस मराठ्यांना आरक्षण देणार नाहीत. हे हाफ चड्डीवाल्यांचे सरकार आहे.’’ राणे आज भाजपात आहेत. त्यांचे तेच मत कायम असावे, पण त्या हाफ चड्डीवाल्या सरकारची नाडी एका सामान्य जरांगे-पाटलांनी खेचली तेव्हा त्यांच्यावर निर्घृण हल्ला केला," अशा शब्दांमध्ये ठाकरे गटाने फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे.

नक्की वाचा >> तहानभूक विसरून मराठ्यांसाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे आहेत तरी कोण?

यासाठी लाठीहल्ला घडवून आणला काय?

संपूर्ण राज्य या प्रश्नी पेटवून राजकीय भाकऱ्या शेकण्यासाठी मराठा आंदोलकांवर अमानुष लाठीहल्ला घडवून आणला का असा प्रश्नही ठाकरे गटाने फडणवीस यांना विचारला आहे. "आंदोलकांवर केलेल्या लाठीहल्ल्याचा निषेध लोकांनी रस्त्यांवर उतरून केला. फडणवीस मुख्यमंत्री असताना भीमा-कोरेगावची दंगल पेटली व फडणवीस हात चोळत बसले. आता ते गृहमंत्री आहेत व मराठा आंदोलन हिंसक झाले. मराठा समाजाने आता दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही इशाराच दिला आहे, ‘फडणवीसांच्या सरकारमधून लगेच बाहेर पडा, नाहीतर परिणामांना सामोरे जा.’ हा इशारा गंभीर स्वरूपाचा आहे. संपूर्ण राज्य या प्रश्नी पेटवून राजकीय भाकऱ्या शेकण्यासाठी मराठा आंदोलकांवर अमानुष लाठीहल्ला घडवून आणला काय?" असं अग्रलेखात म्हटलं आहे.

भाजपाने फडणवीसांसारख्या लोकांना पक्षात ठेवू नये, अन्यथा ते मराठ्यांना...

"गोळीबार व लाठीमार ही फडणवीस यांची दोन प्रमुख शस्त्रे आहेत. रिफायनरीविरोधात आंदोलन करणाऱ्या कोकणी जनतेवरही पोलिसांनी असाच लाठीमार करून डोकी फोडली होती. वारकऱ्यांवरही त्याच निर्घृण पद्धतीने हल्ले देहूमध्ये झाले. या सरकारचे डोके फिरले आहे व त्यांना फक्त लाठ्याच चालवता येतात. मनोज जरांगे म्हणतात ते खरेच आहे. जरांगे-पाटील म्हणतात, ‘‘कुणाला तरी उपोषणाला बसवायचे. ती व्यक्ती मरणाला टेकली की त्याला घेरायचे असे उपमुख्यमंत्री फडणवीस विरोधकांना उद्देशून म्हणाले होते.’’ जरांगे-पाटलांनी या वक्तव्याचा निषेध केला आहे. भाजपाने फडणवीसांसारख्या लोकांना पक्षात ठेवू नये, अन्यथा ते मराठ्यांना गोळ्या घालतील, असा संताप जरांगे-पाटील यांनी व्यक्त केला. त्या संतापाची धग आज महाराष्ट्र भोगतो आहे," असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.

नक्की वाचा >> 'फडणवीस विरोधी पक्षात असते तर...'; जालन्यात आंदोलकांमध्ये उभं राहून राज ठाकरे कडाडले

दुतोंडी सरकारच्या ढोंगाचा बुरखा फाडला

"मुख्यमंत्री शिंदे म्हणतात, मराठा समाजाच्या वेदनांची मला पूर्ण जाण आहे, तर गृहमंत्री फडणवीस तिसऱ्या दिवशी माफी मागण्याची मखलाशी करतात. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे खोटे बोलण्यात वस्ताद आहेत. आधी तुमची पोपटपंची बंद करा व जालन्यातील मराठा आंदोलकांवर गोळ्या चालवण्याचे, अमानुष लाठीमार करण्याचे आदेश कोणी दिले ते सांगा. तर तुम्ही खरे मराठा! एका तोंडाने आंदोलकांवर लाठ्या-गोळय़ा चालवायचे आदेश द्यायचे व दुसऱ्या तोंडाने मला तुमच्या वेदनांची जाण आहे, असे सांगायचे हे ढोंग आहे. जालन्याच्या आंतरवाली गावातील मनोज जरांगे-पाटलांनी शिंदे-फडणवीस-पवार या दुतोंडी सरकारच्या ढोंगाचा बुरखा फाडला आहे!" असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.