कापडी पिशवीवर लग्नाचे निमंत्रण, निकम कुटुंबियांचा पर्यावरणपूरक संकल्प

पायलने आपल्या लग्नाने निमंत्रण पत्रिकेऐवजी कापडी पिशवीवर छापले आहे.

Updated: Nov 16, 2019, 12:07 PM IST
कापडी पिशवीवर लग्नाचे निमंत्रण, निकम कुटुंबियांचा पर्यावरणपूरक संकल्प  title=

प्रविण दाभोळकर, झी मीडिया मुंबई : राज्यात प्लास्टिक बंदी लागू झाली असून कापडी पिशवी हा पर्याय जोमाने समोर येत आहे. शासनातर्फेही कापडी पिशव्यांचा वापर करण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. या पार्श्वभुमीवर निकम कुटुंबियांनी आपल्या घरच्या लग्नात एक नवा पायंडा घालण्याचा प्रयत्न केला आहे. जळगावच्या पायल निकम या तरुणीच्या लग्नाची लगबग सध्या घरी आहे. या लग्नाचे निमंत्रण तिने कापडी पिशवीवर छापले आहे. त्यामुळे कापडी पिशव्यांवरील निमंत्रणाची जोरात चर्चा सुरु आहे. 

लग्नाच्या पत्रिकांचे वेगेवेगळे ट्रेंड बाजारात पाहायला मिळतात. आपल्या घरी सर्वसाधारणपणे कागदी पत्रिकांवरील निमंत्रण येत असतं. पण पायलने आपले लग्न निमंत्रण कापडी पिशवीवर छापले आहे. लग्न झाल्यानंतर इतरांच्या दृष्टीने पत्रिकेचा उपयोग राहत नाही. एकतर रद्दी किंवा हिवाळ्यात थंडीत शेकोटी पेटवायला किंवा कचरा म्हणून रस्त्यावरही पत्रिका फेकली जाते. पर्यायाने पत्रिकेवरील देवीदेवतांचे फोटोही पायदळी येतात. यासाठी निकम परिवाराने 'कापडी पिशवी लग्न निमंंत्रणा'ची संकल्पना समोर आणली आहे. 

२ ऑक्टोबर २०१९ ला सरकारने केलेल्या प्लास्टिक बंदीतून या संकल्पनेची प्रेरणा मिळाली. शहरात प्लास्टिक पिशवीला दंड लागतो म्हणून सर्वजण कापडी पिशव्यांकडे वळले आहेत. कापडी पिशव्यांचा वाढता वापर हा निसर्गासाठी लाभदायक आहे. लग्नाची तारीख उलटली तरीही कापडी पिशवी प्रत्येकाच्या घरात उपयोगी येणार आहे. 

कापडी पिशवी धुतल्यानंतर निमंत्रणाची छापील शाई निघून जाते. त्यानंतर तुम्ही बाजारहट करण्यासाठी हिचा उपयोग करु शकता असे पायलचे भाऊ राहुल निकम यांनी 'झी २४ तास'ला सांगितले. तसेच यातून प्रेरणा घेऊन अशा कापडी पिशव्यांवर निमंत्रण आली तर यातून नवा गृहोद्योग मिळू शकतो असा विश्वासही राहुल यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांना देखील ही कापडी पिशवीवरील लग्न पत्रिका पाठवण्यात आली आहे.