23 वर्षांपूर्वीचा दहशतवादी कारवायांमधील आरोपी जळगावात करत होता शिक्षकाची नोकरी; असा अडकला जाळ्यात

Jalgaon Crime News : दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने भुसावळ येऊन 23 वर्षांपूर्वी फरार झालेल्या आरोपीला अटक केली आहे. दिल्लीत गुन्हा दाखल झाल्यानंतर हा आरोपी फरार होता. अखेर गुरुवारी आरोपीला अटक करण्यात आली.

आकाश नेटके | Updated: Feb 23, 2024, 11:22 AM IST
23 वर्षांपूर्वीचा दहशतवादी कारवायांमधील आरोपी जळगावात करत होता शिक्षकाची नोकरी; असा अडकला जाळ्यात title=

वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव : जळगावच्या भुसावळ शहरातील मिल्लतनगर भागात राहणाऱ्या एकाला दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या 23 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा आरोपी एका शाळेत शिक्षक म्हणून काम करत होता. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने भुसावळमध्ये धडक देत सापळा रचून मिल्लत नगरमधील राहत्या घरातून आरोपीला अटक केली आहे.

हानिफ शेख मोहम्मद हानिफ असे संशयित आरोपीचे नाव असून त्याच्या अटकेने परिसरात खळबळ उडाली आहे. दिल्लीतील न्यू फ्रंट कॉलनी पोलीस स्थानकात 28 सप्टेंबर 2001 युएपीए कायदा तसेच 153 अ, 153 ब आणि 120 ब कलमान्वये गुन्हा दाखल आहेत. संशयित हानिफ शेख हा खडका रोडवरील पालिकेच्या उर्दू शाळेत शिक्षक असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच 1998 मध्ये ‘सिमी’ संबंधित दाखल गुन्ह्यात हानिफ निर्दोष सुटला असल्याची माहिती समोर आली आहे.

गुन्हा दाखल असल्यापासून हानिफ शेख हा फरार होता. दरम्यान, 2001 मधील गुन्हा प्रतिबंधित दहशतवादी संघटना ‘सिमी’ शी संबंधित असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यानंतर आरोपी हानिफ शेखला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. गुरुवारी दुपारी बाजारपेठ पोलिसांच्या मदतीने दिल्लीतून आलेल्या पथकाने हानिफला भुसावळ येथील खडका रोड दत्तनगर मेहराज बिल्डिंगमधून अटक केली. दिल्ली स्पेशल सेलचे निरीक्षक पवन कुमार, एस आय सुमित, नवदीप व अन्य अधिकारी या पथकात सामील होते.

आरोपी हानिफला दिल्लीत नेण्यासाठी दिल्ली स्पेशल सेलच्या अधिकाऱ्यांनी भुसावळ येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात न्यायाधीश व्हीं सी बर्डे यांच्या खंडपीठासमोर ट्रान्झिट रिमांड मागितला होता. न्यायालयाने प्रकरणाची माहिती करुन घेतल्यानंतर दिल्ली स्पेशल सेलच्या पोलिसांना 48 तासांचा ट्रान्झिट रिमांड मंजूर केला.

दरम्यान, स्टूडेंट्स इस्लामिक मूवमेंट ऑफ इंडिया या दहशतवादी संघटनेच्या इस्लामिक मुव्हमेंट या मासिकामध्ये प्रक्षोभक लिखाण केल्याबद्दल आरोपी हानीफ विरुद्ध दिल्लीत 23 वर्षांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी आरोपी शेख सातत्याने गैरहजर राहिल्याने दिल्ली न्यायालयाने 2002 मध्ये त्याला फरार घोषित केले होते. त्यानंतर संशयित आरोपी हा भुसावळ येथे असल्याची माहिती दिल्ली स्पेशल सेलला मिळाली. त्यानंतर आरोपीला अटक करण्यासाठी दिल्ली स्पेशल सेलचे 15 अधिकारी आणि कर्मचारी भुसावळमध्ये दाखल झाले.