भाजपसाठी अधिक जागा मागणे हे माझे काम - चंद्रकांत पाटील

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरु आहे.  

Updated: Aug 29, 2019, 08:03 PM IST
भाजपसाठी अधिक जागा मागणे हे माझे काम - चंद्रकांत पाटील title=

नवी मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरु आहे. युती होणार की नाही, याबाबत दोन्ही पक्षांकडून विधाने करण्यात येत आहे. दोन्ही पक्ष एकमेकांवर कुरघोड्या करण्यात मागे नाही. कोणी काहीही बोलणार नाही, तिघांमध्येच युतीची चर्चा होईल, असे वारंवार सांगितले जात असले तरी दोन्ही पक्षातील नेतेमंडळी युतीचा विषय पुन्हा पुन्हा काढताना दिसत आहेत. आज नवी मुंबईत भाजप प्रदेश अध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा याबाबत वक्तव्य केले आहे. पक्षासाठी अधिक जागा मागणे हे माझे काम, असे ते म्हणालेत.

नवी मुंबईमधील एपीएमसी मार्केट हे आंतरराष्ट्रीय मार्केट झाल्यावर शेतकऱ्यांच्या उत्पादनाला भाव मिळेल, यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना एपीएमसी प्रशासनाला दिल्या आहेत, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली. नवी मुंबईमधील एपीएमसी मार्केटमधील गाळ्याच्या उदघाटनसाठी ते आले असता, त्यांनी याबाबत माहिती दिली.

आपल्या देशात शेतीमालाचे उत्पन्न वाढले आहे. साखरेचे उत्पन्न तीन वर्षे पुरेल एवढे झाले आहे. या उत्पन्नाला भाव मिळावा यासाठी हा माल परदेशात जाणे गरजेचे आहे. भाजीपाला देखील कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवून परदेशात पाठवणे गरजेचे आहे. यासाठी हे मार्केट आंतरराष्ट्रीय होणे गरजेचे आहे. याचा प्रस्ताव तयार करून सादर करण्याचे आदेश एपीएमसी प्रशासकाना  दिले असल्याचे  चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

सांगली आणि कोल्हापूर पूरग्रस्त भागातील गावांना उभे राहण्यासाठी तेथील शाळा, ग्रामपंचायत कार्यालये उभारणे गरजेचे आहे. यासाठी 'आपदा' या नावाने खाते सुरू करण्यात येत आहे. यात भाजपचे पदाधिकारी, भाजपचे आमदार आणि नगरसेवक एक महिन्याचा पगार देणार आहेत, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली. तर कोल्हापूर देवस्थान पूरग्रस्त गावातील सर्व मंदिरांची डागडुजी करणार असल्याचे ते यावेळी म्हणालेत.