शिवसेना - भाजप युतीला कोल्हापुरात मोठा सुरूंग?

भाजप-शिवसेना नेते युतीच्या आणाभाका घेत असले तरी कोल्हापुरात युतीला सुरूंग लागण्याची शक्यता आहे. 

Updated: Mar 8, 2019, 10:37 PM IST
शिवसेना - भाजप युतीला कोल्हापुरात मोठा सुरूंग? title=
संग्रहित छाया

प्रताप नाईक, कोल्हापूर : भाजप-शिवसेना नेते युतीच्या आणाभाका घेत असले तरी कोल्हापुरात युतीला सुरूंग लागण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आणि भाजप नेत्या शौमिका महाडिक यांनी शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांचा प्रचार करणार नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे कोल्हापुरात युतीचे काय होणार अशी चर्चा सुरू झाली आहे. कोल्हापुरात राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक विरूद्ध शिवसेनेचे संजय मंडलिक असा सामना होण्याची शक्यता आहे. धनंजय महाडिक कितीही जवळचे असले तरी युतीचा उमेदवार म्हणून संजय मंडलिकांचा प्रचार करणार असे काही दिवसांपूर्वी भाजपचे नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटलांनी सांगितले.

चंद्रकांत पाटलांचा आदेश बहुदा भाजप कार्यकर्त्यांना मान्य नसावा. कोल्हापुरातल्या भाजप नेत्यांनी संजय मंडलिक यांच्याविरोधात उघड आघाडी उघडली आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी संजय मंडलिक यांचा प्रचार करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. याबाबतची त्यांची एक ध्वनीफित सोशल मीडियावर फिरू लागली आहे.

ऑडिओ क्लिप - शौमिका महाडिक सांगतात, आज जे दोन लोकसभेचे उमेदवार आहेत. दोन उमेदवार आहेत एक खासदार धनंजय महाडिक साहेब आहेत आणि त्यांच्याविरोधात जे कुणी उमेदवार उभे राहणार असतील त्यांचासुद्धा जो कारभार जो आपणसुद्धा पाहिला आहे. कदाचित ते अध्यक्ष असताना त्यावेळी कुणी कुणी अध्यक्ष म्हणून जर त्यांची कारकीर्द पाहिली किंवा अभ्यासली तर मला काही चांगले काम वाटलं नाही. तुम्हाला जास्त माहिती आहे माझ्यापेक्षा. जर अध्यक्ष म्हणून एखादी स्थानिक स्वराज्य संस्था जर एखाद्या व्यक्तीला व्यवस्थित चालवता आली नाही तर त्याने देशाचा कारभार करू, नये असे माझं स्पष्ट मत आहे. 

राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक हे शौमिका महाडिक यांचे दीर आहेत. शौमिका महाडिक यांच्यासह काही भाजप नगरसेवक धनंजय महाडिक यांच्या प्रचारात सहभागी झाले आहेत. अशा स्थितीत भाजपची मते संजय मंडलिक यांना कशी मिळणार, असा प्रश्न शिवसेनेच्या नेत्यांना पडला आहे. चंद्रकांत पाटील आता पक्षातल्या नेत्यांची कशी समजूत काढतील हे पाहावं लागेल.