अहमदनगर : विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील हे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या बंगल्यावर गेले आहेत. या दोघांमध्ये चर्चा सुरू आहे. अहमदनगरची जागा काँग्रेसला सोडण्यास राष्ट्रवादी तयार नाही. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या सुजय विखेंनी आता पर्याय शोधण्यास सुरूवात केल्याची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. त्याच पार्श्वभूमीवर सुजय विखेंनी गिरीश महाजन यांची भेट घेतल्याचं बोलले जात आहे.
दरम्यान, आपण अहमदनगरची जागा लढविणार म्हणजे लढविणार. दोन वर्षांपासून मी या मतदारसंघात काम करत आहे. निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची आपण केव्हाच तयारी केली आहे. हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे. दोन्ही काँग्रेसची आघाडी झाली तरी या जागेचा प्रश्न निकाली निघालेला नाही. दोन्ही काँग्रेसने या जागेवर दावा ठोकला आहे. त्यामुळे सुजय विखे-पाटील यांची कोंडी झाली आहे. मध्यंतरी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही जागा काँग्रेसला सोडल्याचे म्हटले होते. मात्र, त्यांनतर प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आणि नेते अजित पवार यांनी ही जागा कोणाला सोडलेली नाही. राष्ट्रवादीच ही जागा लढवणार असे जाहीर केले. त्यामुळे या जागेवरुन दोन्ही काँग्रेसमध्ये चढाओढ सुरु झाली आहे. मात्र, राष्ट्रवादी ही जागा सोडण्यास तयार नसेल तर करायचे काय, यावरुन उपाय म्हणून सुजय हे चाचपणी करत आहेत. त्यासाठीच भाजपचे नेते गिरीश महाजन यांची भेट घेतल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, काँग्रेसकडून महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांची चाचपणी केली असून त्यासाठीची नावांची यादी तयार झाल्याची सूत्रांची माहिती आहे. सोलापूरमधून सुशीलकुमार शिंदे, रामटेकमधून मुकुल वासनिक यांना संधी मिळणार आहे. तर यवतमाळमधून माणिकराव ठाकरे आणि नांदेडमधून अमिता चव्हाण यांना उमेदवारी मिळणार आहे. दक्षिण मुंबईतून मिलिंद देवरा यांचं नाव निश्चित करण्यात आलंय. नागपूरमधून नितीन गडकरी यांच्याविरोधात काँग्रेसकडून नाना पटोले यांना मैदानात उतरवण्याची चर्चा आहे. नाना पटोल यांना नागपुरातल्या उमेदवारीबाबत विचारणा करण्यात आलीय. यावेळी नाना पटोले यांनी निवडणूक लढवण्यास तयार असल्याचं सांगितले.