'अर्थमंत्री फक्त थापा मारण्यात आणि...'; अर्थसंकल्पावर प्रकाश आंबेडकारांची टीका

Budget 2024 : लोकसभा निवडणुकीआधी मोदी सरकारने त्यांचा शेवटचा अर्थसंकल्प जाहीर केला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी हा अंतरिम अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला.

Updated: Feb 1, 2024, 03:15 PM IST
'अर्थमंत्री फक्त थापा मारण्यात आणि...'; अर्थसंकल्पावर प्रकाश आंबेडकारांची टीका title=

Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सरकार आयकरासह सर्वसामान्यांशी संबंधित अनेक क्षेत्रात मोठी घोषणा करू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा करण्यात आल्या नसल्या तरी ग्रामीण भागातील जनतेसाठी आणि महिला वर्गासाठी काही घोषणा करण्यात आल्या आहेत. या अर्थसंकल्पावर सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी भाष्य केलं आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली आहे. 

वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत टीका केली आहे. "सरकार फक्त ज्ञान देत आहे. पण भारतातील तरुण, गरीब, महिला आणि शेतकरी यांच्यासाठी सरकार नाही. अर्थमंत्री केवळ स्वत: थापा मारण्यात, भाषणबाजीत आणि खोटे बोलण्यात गुंतल्या आहेत. जर अर्थव्यवस्था चांगली कामगिरी करत असेल, तर गेल्या नऊ वर्षांत 12,88,293 उद्योजकांनी भारत का सोडला? 7,25,000 लोकांनी, बहुतेक व्हायब्रंट गुजरातमधील लोकांनी बेकायदेशीरपणे अमेरिकेत प्रवेश करण्याचा प्रयत्न का केला?  वास्तविक सरासरी उत्पन्न 50 टक्क्यांनी वाढल्याच्या माहितीचा स्रोत काय आहे? पंतप्रधान किसानसाठी उद्धृत केलेल्या लाभार्थ्यांची संख्या आणि माहिती संशयास्पद आहे! अंतरिम अर्थसंकल्पात फक्त ग्यान सादर केले आहे," असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरेंची टीका

"निर्मला सीतारमण यांनी गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी या 4 जाती देशात असून त्यांच्यासाठी काम करणार असल्याचं सांगितलं. याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. त्यांनी मोठं धाडस केलं आहे. अर्थसंकल्प मांडताना पंतप्रधानांसमोर हे बोलण्याचं धाडस त्यांनी दाखवलं. निवडणुका आल्यानंतर तरी त्यांनी तुमचे सुटाबूटातले मित्र इतकाच देश नव्हे असं त्यांनी पंतप्रधानांना सांगितलं आहे. त्यांच्या पलीकडेही जो देश आहे त्यात गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी आहेत असं त्यांनी सांगितलं. 10 व्या वर्षी तुम्हाला हे कळलं की, अदानी वैगेरे म्हणजे देश नाही. सुटाबूटातलं सरकार आता गरिबांकडे लक्ष द्यायला लागलं आहे," असे उद्धव ठाकरे म्हणाले.

"आज सादर झालेला अर्थसंकल्प हा केवळ अंतरिम अर्थसंकल्प नसून तो सर्वसमावेशक आणि नाविन्यपूर्ण आहे. या अर्थसंकल्पातून तरुण, गरीब, महिला आणि शेतकरी या चार स्तंभांना सक्षम करण्यास मदत होणार आहे. हा अर्थसंकल्प भारताचे भविष्य घडवणारा अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे भारतातील तरुणांच्या आशा-आकांक्षांचे प्रतिबिंब आहे," असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.