मुंबई : इन्स्टाग्राम (Instagram) स्टार असलेल्या एसटी महामंडळातील (ST Corporation) महिला कंडक्टरचे (Lady Conductor) निलंबन अखेर मागे घेण्यात आलं आहे. कर्तव्यावर असताना स्वत:चे व्हिडिओ (Video) तयार करून सोशल मीडियात (Social Media) व्हायरल करणाऱ्या मंगल सागर पुरी (Mangal Sagar Puri) या खूपच लोकप्रिय आहेत. कळंबा आगारातील मंगल पुरी कंटक्टरचा ड्रेस घालून इन्स्टा रील तयार करत होत्या. त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. या कारवाईनंतर सोशल मीडियावर रोष व्यक्त करण्यात आला होता. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनीही ट्विट करत याबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता मंगल पुरी यांच्यावरील निलंबनाची कारवाई रद्द करण्यात आलीय.
सोशल मीडियावर टाकण्यात आलेल्या व्हिडिओंमुळे एसटी महामंडळाची प्रतिमा मलीन झाल्याचं सांगत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर लगेचच घुमजाव करत ड्रायव्हर सीटवर बसून गैरवर्तन केल्याचा ठपका एसची महामंडळांनं ठेवला होता. इतकच नाही तर त्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या सहकाऱ्यालाही निलंबित करण्यात आले होते. यानंतर सोशल मीडियावर या कारवाईविरोधात नाराजी व्यक्त करण्यात आली होती. रोहित पवार यांनीही ट्विट करत याबाबत प्रतिक्रिया दिली होती.
"अनेक ताणतणाव असूनही दररोज लाखो प्रवाशांना विनाअपघात सेवा देणारे एसटीचे कर्मचारी हे खरे हिरो आहेत. त्यातील एखादी मंगल पुरी ही भगिनी इन्स्टा स्टार होत असेल तर अशा कर्मचाऱ्यांचं खरं तर कौतुक करायला पाहिजे. पण त्याऐवजी तिला तडकाफडकी निलंबित करणं चुकीचं वाटतं," असं रोहित पवार यांनी म्हटलं होतं.
त्यानंतर आता निलंबन मागे घेतल्याची माहितीही रोहित पवार यांनी ट्विटद्वारे दिलीय. रोहित पवार यांनी सरकारचे आभार मानले आहेत. "माझ्यासह इतर अनेकांनी केलेल्या मागणीची दखल घेत अखेर इन्स्टास्टार मंगल गिरी या महिला कंडक्टरचं निलंबन रद्द करण्यात आलं. याबद्दल सरकारचे आभार! भविष्यात गिरीताई याही एसटीच्या गणवेशाचा आदर ST चा सन्मान राखतील अशी अपेक्षा!," असे रोहित पवार यांनी म्हटलंय.
माझ्यासह इतर अनेकांनी केलेल्या मागणीची दखल घेत अखेर #InstaStar मंगल गिरी या महिला कंडक्टरचं निलंबन रद्द करण्यात आलं. याबद्दल सरकारचे आभार!
भविष्यात गिरीताई याही #ST च्या गणवेशाचा आदर ST चा सन्मान राखतील अशी अपेक्षा! https://t.co/1mgRVfh5gL
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 14, 2022
अजित पवारांनी केला होता फोन
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मंगल पुरी यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईवरुन आक्रमक झाले होते. ही कारवाई मागे घेण्यासाठी पवारांनी एसटी अधिकाऱ्यांना फोन केला होता.