झी 24 तासचा दणका, रुग्णाला वैधता संपलेले सलाईन दिल्या प्रकरणी चौकशीचे आदेश

 कोल्हापुरात शासकीय रुग्णालयात रुग्णांच्या जीवाशी खेळ

Updated: Feb 6, 2021, 01:30 PM IST
झी 24 तासचा दणका, रुग्णाला वैधता संपलेले सलाईन दिल्या प्रकरणी चौकशीचे आदेश  title=

कोल्हापूर : कोल्हापुरात शासकीय रुग्णालयात रुग्णांच्या जीवाशी कसा खेळ सुरु आहे याचं धक्कादायक वास्तव उघड झाल्यानंतर छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाचे मेडिकल सुप्रीडेंट विजय बरगे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. रुग्णाला वैधता संपलेले सलाईन दिल्या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. कोल्हापूरमधील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार झी २४ तासने दाखवला होता.  या प्रकरणात 7 दिवसात चौकशी करून कारवाई करणार असल्याचं मेडिकल सुप्रीडेंट यांनी सांगितलं आहे.

वार्डचे  इंचार्ज ड्रॉक्टर, ड्युटीवर असणारा नर्सिंग स्टाफ, वार्ड बॉय यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात एका 75 वर्षीय रुग्णाला चक्क मुदत संपलेलं सलाईन लावण्यात आल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे.

याबाबत रुग्णाच्या मुलानं जिल्हा शल्य चिकित्सकांकडे लेखी तक्रारही केली. मात्र त्यानंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी अत्यंत उर्मठ उत्तरं दिल्याचा आरोप रुग्णाच्या मुलानं केला आहे. पेठ वडगाव मधील महादेव खंदारे यांच्यावर उपचार करताना रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी ही अक्षम्य चूक केली आहे. यावर तक्रार केली असता आपला रुग्ण दगावला का ? असा अजब सवालच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी केला होता.