Uday Samant : उद्योगमंत्री उदय सामंत अपघातातून थोडक्यात बचावले; अलिबागवरुन परतताना दुसऱ्यांदा बोटीचा अपघात

Uday Samant : काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणातील महत्त्वाच्या व्यक्तींच्या अपघातांचे सत्र सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या बोटीला दुसऱ्यांदा अपघात झाला आहे. याआधीही अलिबागवरुन परताता सामंत यांची बोट भरसमुद्रात बंद पडली होती

आकाश नेटके | Updated: Apr 3, 2023, 04:58 PM IST
Uday Samant : उद्योगमंत्री उदय सामंत अपघातातून थोडक्यात बचावले; अलिबागवरुन परतताना दुसऱ्यांदा बोटीचा अपघात title=
(प्रातिनिधीक छायाचित्र)

Uday Samant : राज्‍याचे उद्योगमंत्री आणि रायगडचे पालकमंत्री उदय सामंत (Industries Minister Uday Samant) आज दुसऱ्यांदा बोट अपघातातून (boat accident) बचावले आहेत. सोमवारी सकाळी अलिबाग येथून परतत असताना हा अपघात झाला आहे. याआधीही अलिबागवरुन परतत असताना मंत्री उदय सामंत यांची बोट भर समुद्रात बंद पडली होती. आता पुन्हा एकदा अलिबागवरुन येत असताना उदय सामंत यांच्या बोटीला मांडवा येथे (mandwa) अपघात झाला. सामंत यांच्या स्‍पीडबोटवरील कॅप्टनचे नियंत्रण सुटले आणि बोट धक्‍क्‍यावर आदळता आदळता अगदी थोडक्‍यात बचावली. खु्द्द उदय सामंत यांनी हा किस्‍सा पत्रकार परीषदेनंतर अनौपचारीक गप्‍पा मारताना सांगितला आहे.

नेमकं काय घडले?

यंदा किल्‍ले रायगडावर 350 वा राज्‍याभिषेक सोहळा पार पडतो आहे. त्‍या निमित्ताने तयारीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत, आमदार महेंद्र दळवी, रायगड विकास प्राधिकरणाचे अध्‍यक्ष छत्रपती संभाजीराजे,कोकण आयुक्‍त डॉ. महेंद्र कल्‍याणकर यांच्‍या प्रमुख उपस्थितीत अलिबागच्‍या जिल्‍हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्‍यात आली. या बैठकीला मंत्री उदय सामंत सोमवारी सकाळी स्‍पीडबोटने अलिबागला यायला निघाले होते. समुद्रात बोटीचा वेग कमी होता. मात्र मांडवा जेटीजवळ बोट आली असता चालकाने बोटीचा वेग वाढवला. यामुळेच त्याचे बोटीवरील नियंत्रण सुटले आणि बोट वेगाने जेट्टीकडे गेलली. सुदैवाने ही बोट जेट्टीवर आदळली नाही आणि उदय सामंत अगदी थोडक्‍यात बचावले. स्पीडबोटच्या गियरमध्‍ये बिघाड झाल्‍याने हा प्रकार झाल्‍याचे म्हटले जात आहे. मात्र काही क्षण आपल्‍या काळजाचा ठो‍का चुकला होता असे उदय सामंत यांनी सांगितले.

हा सर्व प्रकार आमदार महेंद्र दळवी आणि त्‍यांचे सहकारी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते जेट्टीवरून पाहत होते. आम्‍ही देखील या प्रकाराने घाबरलो होतो असे आमदार दळवी म्‍हणाले.

दरम्यान, यापूर्वीदेखील एकदा जिल्‍हा नियोजन समितीची बैठक आटोपून मुंबईकडे परतत असताना उदय सामंत यांना घेवून जाणारी बोट गेटवे ऑफ इंडियाजवळ समुद्रातच बंद पडली होती. त्‍यानंतर दुसऱ्या बोटीने सामंत किनाऱ्यावर पोहोचले होते. रायगडमधील तीन आमदारांपैकी कुणाला तरी पालकमंत्री व्‍हायचंय म्‍हणूनच हे प्रकार होत असावेत असे सामंत गमतीने म्‍हणाले आणि उपस्थितांमध्‍ये हास्‍याचे फवारे उडाले.

"सुरवातीला काय घडत आहे याचा अंदाज आम्हाला आला नाही. बोट जाऊन खांबाना आदळली तेव्हा लक्षात आले हे काही तरी भयंकर घडत आहे. सुदैवाने मोठी दुर्घटना झाली नाही. काही दिवसांपूर्वी याच मार्गावरुन प्रवास करताना स्पीड बोट मध्येच बंद पडली होती. त्यामुळे आता इथून पुढे स्थानिक आमदारांना सोबत घेऊनच स्पीड बोटीने प्रवास करण्याचे मी ठरवले आहे," असे उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले.