सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड : पवनपुत्र हनुमानाने तळपता सूर्य गिळला अशी दंत कथा आहे. मात्र, एका साडेतीन वर्षाच्या मुलाने हनुमानच (Hanuman) गिळला आहे. नांदेडमध्ये (Nanded) ही धक्कादायक घटना घडली आहे. खेळता खेळता या मुलानं धातूची हनुमानाची मूर्ती असलेलं किचेन गिळलं आहे. याआधीच नांदेडमध्येच तीन वर्षांच्या चक्क खिळा गिळला होता. या घटनेमुळे पालकांनी मुलांकडे डोळ्यात तेल घालून लक्ष देण्याची गरज असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखीत झाले आहे.
लहान मुलांकडे सतर्कतेने लक्ष देणे किती गरजेचे असते ते नांदेडमधील दोन घटनांमुळे समोर आले आहे. एका तीन वर्षाच्या मुलाने खेळताना अडीच इंचाचा लोखंडी खिळा गिळला तर एका साडेतीन वर्षाच्या मुलाने तीन इंच आकाराची हनुमानाची धातूची मूर्ती गिळली. डॉक्टरांनी दोन्ही बालकांच्या अन्ननलिकेतून यशस्वीरीत्या खिळा आणि हनुमानाची मूर्ती काढली आहे.
मुलं सज्ञान होईपर्यंत क्षणोक्षणी त्यांच्याकडे लक्ष देणे किती आवश्यक आहे आहे नांदेडमध्ये घडलेल्या दोन घटनांवरून पुन्हा एकदा दिसून आले. खेळताना एका मुलाने लोखंडी खिळा गिळला होता तर एका मुलाने धातूची लहान मूर्ती. इंडोस्कोपी द्वारे दोन्ही मुलांवर यशस्वी उपचार करण्यात आले.
हिंगोलीतील एक एका साडेतीन वर्षाच्या बालकाने गळ्यातील लॉकेट असलेली तीन इंच आकाराची धातूची मूर्ती गिळली. पालकांनी त्याला तात्काळ नांदेड च्या खाजगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टर नितीन जोशी यांनी इंडोस्कोपीद्वारे अवघ्या 1 मिनिट 10 सेकंदात हनुमानाची मूर्ती बाहेर काढली.
दुसऱ्या एका घटनेत कंधार तालुक्यातील हाळदा येथील एका तीन वर्षाच्या मुलाने खेळताना लोखंडी खिळा गिळला. मुलाला सतत उलट्या होत असल्याने पालकांनी त्याला खाजगी रुग्णालयात दाखल केले. अडीच इंच लांबीचा हा खिळा होता. डॉक्टरांनी इंडोस्कोपी द्वारे मुलाला कुठलीही इजा न होता खिळा बाहेर काढला.
या दोन्ही घटनेत सुदैवाने मुलांनी गिळलेल्या वस्तू अन्ननलिकेत गेल्या होत्या. जर श्वासनलिकेत वस्तू अडकली असती तर मुलांच्या जीवावर बेतले असते. त्यामुळे मुलांपासून सेफटी पिन, कॉइन्स, पेंडल्स, किंवा कुठल्याही धारदार वस्तू दूर ठेवाव्यात असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.
लहान मुलांनी धातूच्या वस्तू गिळल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. सुदैवाने इंडोस्कोपी तंत्रज्ञानामुळे विना ऑपरेशन उपचार शक्य झाले आहेत. पण तोच धातूचा तुकडा श्वासनलिकेत गेला तर तुमच्या जिवाच्या तुकड्याच्या जीवावर बेतू शकते. त्यामुळे पालकांनो मुलांची काळजी घ्या.