कोपरगाव : ज्येष्ठ समाजसेविका आणि अनाथांची आई सिंधुताई सपकाळ यांनी हभप इंदुरीकर महाराज यांच्या वादावर खंत व्यक्त केली आहे. किर्तनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर काही नकळत बोलले असतील, तर त्याचं एवढं भांडवल कशाला करता? सिंधुताई अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावमध्ये एका शैक्षणिक संकुलाच्या कार्यक्रमात बोलत होत्या.
सिंधुताई याविषयावर पुढे आणखी बोलताना म्हणाल्या, इंदुरीकर महाराजांचं कार्य मोठं आहे, आपल्या प्रबोधनातून वाईट मार्गाला जाणाऱ्या तरूणांना त्यांनी स्वाभिमानाने जगण्याचा मूलमंत्र दिला आहे. इंदुरीकरांनी आपण चुकलो असं म्हणत त्यांनी आपलं कार्य सुरू ठेवावं, असं सिंधुताई सपकाळ यांनी म्हटलं आहे.
टीका करणाऱ्यांनीही महाराजांच्या शब्दाला धरून न बसता, त्यांच्या चांगल्या कार्याचा देखील विचार करावा, वाद मिटवता घ्या, इंदुरीकरांनी कीर्तनातून जे प्रबोधन केलं, आजवर केलेल्या त्यांच्या चांगल्या कष्टावर पाणी फिरवायचं का? असा सवाल सिंधुताई सपकाळ यांनी केला आहे.
सम तारखेला संभोग केला तर मुलगा जन्माला येतो, आणि विषम तारखेला संभोग केला तर मुलगी जन्माला येते, असं वक्तव्य इंदुरीकर यांनी एका कीर्तनातून केल्यानंतर या वादाला सुरूवात झाली आहे. यानंतर इंदुरीकर यांनी हे आपलं मत नसून ग्रंथात हा उल्लेख असल्याचं म्हटलं होतं.