मुंबई : जून अखेर उजाडला तरी मुंबईत म्हणावा तेवढा पाऊस आणि गारवा अजूनही आला नाही. मुंबईसह उपनगरात ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. तर राज्यातील काही भागांमध्ये हवामान विभागाकडून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजपासून पुढचे दोन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांमध्ये पुढचे 24 तास मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
अहमदनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित ठिकाणी पुढचे तीन दिवस रिमझिम ते तुरळक पाऊस असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
नाशिक, शिर्डी आणि सातार जिल्ह्यांमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. त्यामुळे नागरिकांची दाणादाण उडाली. शिर्डीत पावसाच्या तडाख्यामुळं शहरातील व्यापारी संकुलात मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं.
नाशिकच्या सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात पांगरी शिवारात ढगफुटीसदृश पाऊस झाला. यावेळेत सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. साताऱ्यात महाबळेश्वर प्रतापगड भागात मुसळधार पाऊस झाला. या पहिल्याच पावसात, चतुरबेट इथला कोयना नदीवरचा पूल वाहून गेला. यामुळे काही गावांचा संपर्क तुटला.