पावसासोबत आता गारठा वाढणार, राज्यात थंडीची लाट येणार- IMD

राज्याला हुडहुडी भरलीय तर मुंबईतही गेल्या 10 वर्षांतील सर्वात कमी तापमानाची नोंद

Updated: Jan 24, 2022, 03:55 PM IST
पावसासोबत आता गारठा वाढणार, राज्यात थंडीची लाट येणार- IMD title=

मुंबई: राज्यात सध्या गारठा वाढला आहे. गेल्या 10 वर्षातील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा खाली गेला आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 

दुसरीकडे धुळीच्या वादळामुळे मुंबईवर धूलिकरणांचं मळभ आहे. त्यामुळे श्वसनाचे आजार होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. धुळीच्या वादळानं मुंबईकरांचा श्वास कोंडला असतानाच दुसरीकडे मुंबईच्या तापमानानं मुंबईकरांना हुडहुडी भरविली आहे. 

रविवारी मुंबईत 10 वर्षांतील नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आलीय. रविवारी कुलाबा इथे २४ अंश सेल्सिअस आणि सांताक्रूझ इथे २३.८ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले. सरासरीच्या तुलनेत दोन्ही ठिकाणी अनुक्रमे ६ आणि ७ अंशांची घट झाली होती. हे गेल्या १० वर्षांतील सर्वात कमी कमाल तापमान नोंदवलं गेलं. 

आज सकाळी कुलाबा इथं 16.2 किमान तापमान तर सांताक्रुझ इथं 15 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीय. दरम्यान, धूळीचे वादळ, पाऊस असे बदलते हवामान यास कारणीभूत असून, हवामानात झालेल्या बदलामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत.

धुळीच्या वादळामुळे राज्यातील अनेक भागातील पारा घसरला आहे. मध्य आणि उत्तर महाराष्ट्रात कडाक्याची थंडी पडली आहे. निफाडचा पारा तर 5.5 अंशावर गेला आहे. 

मुंबई, पुणे, नाशिक, महाबळेश्वरमध्येही थंडीचा कडाका वाढला आहे. कडाक्याच्या थंडीमुळे जनजीवन विस्कळीत झालं असून पिकांनाही या थंडीचा फडका बसू लागला आहे. पुढील 5 दिवसांत उत्तर-पश्चिम आणि मध्य भारताच्या बहुतांश भागांमध्ये किमान तापमानात 3-5°C ने हळूहळू घट होण्याची शक्यता आहे. 25 व 26 जानेवारी Flag of India रोजी उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी, थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.