मुंबई : भाजपच्या नाराज नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी सस्पेन्स काय ठेवला आहे. उद्या त्या काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, त्या आज मुंबईहून परळीकडे रवाना झाल्या. यावेळी मीडियाने त्यांना सवाल केला. त्यावेळी त्या म्हणाल्यात, जे काही बोलणार आहे ते उद्याच बोलेन आज नाही. तसेच उद्याचा कार्यक्रम राजकीय नसेल असे सांगत ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंशी कौटुंबिक चर्चा झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
१२ डिसेंबरला गोपीनाथ गडावर भूमिका मांडणार असल्याचे माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले. त्या उद्याच्या कार्यक्रमासाठी मुंबईहून परळीला रवाना झाल्या. यावेळी त्यांनी उद्याच्या गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाला नेहमी उपस्थित राहत असलेले नेते उपस्थित राहतील, असे सांगितले. तसेच उद्याचा कार्यक्रम राजकीय नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, भाजपकडून सावध भूमिका घेण्यात येत आहे. पंकजा मुंडे उद्याच्या गोपीनाथ गडावरील मेळाव्यात सारे काही स्पष्ट करतील. प्रदेशाध्यक्ष म्हणून आपण देखील उपस्थित राहणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. ते पुण्यात बोलत होते. तसेच खडसेंची भूमिका पक्षाने जाणून घेतली असून त्यावर योग्य ती कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
तर दुसरीकडे भाजप-शिवसेनेची तीस वर्षांची मैत्री आहे. ती नैसर्गिक आहे. आमचे रक्त एकच म्हणजे हिंदुत्व आहे. चर्चेसाठी दरवाजे खुले आहेत, असे म्हणण्यापेक्षा आम्हाला अहंकार नव्हता. त्यामुळे असे काही होत असेल तर त्याचे स्वागतच असल्याची प्रतिक्रिया चंद्रकांत पाटलांनी दिली आहे.
लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीचे औचित्य साधून गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या पुढाकाराने परळी शहरातील उप जिल्हा रूग्णालयात १२ डिसेंबर रोजी महाआरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे. सकाळी ९ ते १२ वा. दरम्यान हे शिबीर होणार आहे. शिबीरात सहभागी होणा-या गरजू रूग्णांची सर्व आजारांची तपासणी, औषधोपचार, शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहे.