'मी काय केले विचारता, मग पद्मविभूषण कशासाठी दिलात?'

५३ वर्षांपासून राजकारणात राहिलेल्या मला पाच वर्षांपूर्वी आलेली व्यक्ती  सवाल विचारते.

Updated: Oct 17, 2019, 09:39 PM IST
'मी काय केले विचारता, मग पद्मविभूषण कशासाठी दिलात?' title=

नाशिक: महाराष्ट्रासाठी मी आजवर काय केले, असे भाजपच्या नेत्यांकडून विचारले जाते. मग त्यांनी मला पद्मविभूषण पुरस्कार दिलाच कशासाठी, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी उपस्थित केला. ते गुरुवारी नाशिकमधील प्रचारसभेत बोलत होते. 

यावेळी त्यांनी पवारांनी आजवर महाराष्ट्रासाठी काय केले, असा सवाल विचारणाऱ्या अमित शाह यांना लक्ष्य केले. त्यांनी म्हटले की, पाच वर्षांपूर्वी कोणालाही माहिती नसणारे अमित शहा आज देशाचे गृहमंत्री आहेत. मी महाराष्ट्रासाठी काय केले, असे ते विचारतात. १४ वेळा निवडून आलेल्या आणि ५३ वर्षांपासून राजकारणात राहिलेल्या मला पाच वर्षांपूर्वी आलेली व्यक्ती हा सवाल विचारते. पण मग माझ्या कार्याचा गौरव म्हणून मला पद्मविभूषण पुरस्कार का देण्यात आला, असा रोकडा सवाल शरद पवार यांनी विचारला. 

भाजपच्या काळात जगभरात देशाची सर्वाधिक बेइज्जती झाली- शरद पवार

तसेच नाशिककरांना मुख्यमंत्र्यासारख्या दत्तक बापाची गरज नसल्याची घणाघाती टीकाही त्यांनी केली. आम्हाला गरीब बाप चालेल, पण तो स्वाभिमानी असावा, खरे प्रेम करणारा असावा, असेही पवारांनी म्हटले. 

शरद पवार म्हणजे कसलेला गडी; हवेचा रोख बरोबर ओळखतात- मोदी

तत्पूर्वी पिंपळगाव येथील सभेतही पवारांनी मुख्यमंत्र्यांना टोला हाणला. कुस्ती कोणासोबत खेळावी हे ठरवायचे असते. लहानपणी जत्रेत कुस्ती खेळायचो. तेव्हा पैशाऐवजी रेवड्या मिळायच्या. मुख्यमंत्र्यांना कुस्तीत रेवड्याही मिळायच्या नाहीत. कुस्ती ही बरोबरीच्या पैलवानाशी होते, लहान मुलांशी नाही, असे पवारांनी सांगितले.