चुकीला माफी नाही! IAS पूजा खेडकर राहत असलेल्या शासकीय विश्रामगृहात पोलिसांची टीम दाखल

IAS Pooja Khedkar Controversy: वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर याच्या शासकीय विश्रामगृह इथं पोलिसांची टीम दाखल झाली आहे. 15 जुलै रात्री उशीरा पोलिसांनी वाशिमच्या शासकीय विश्रामगृहात प्रवेश केला. 

Pravin Dabholkar | Updated: Jul 16, 2024, 07:51 AM IST
चुकीला माफी नाही! IAS पूजा खेडकर राहत असलेल्या शासकीय विश्रामगृहात पोलिसांची टीम दाखल title=
IAS Pooja Khedkar

IAS Pooja Khedkar Controversy: ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचा पाय दिवसेंदिवस आणखी खोलात चालला आहे. खासगी ऑडीवर लाल दिवा, महाराष्ट्र शासनची पाटी आणि स्वतंत्र केबिनची मागणी इथपासून सुरु झालेल्या प्रकरणात इतके मोठे टर्न ट्वीस्ट येतील याचा कदाचित पूजा यांनीदेखील विचार केला नसावा. वादात सापडल्यानंतर पूजा यांची पुण्यातून थेट वाशिममध्ये बदली करण्यात आली. दरम्यानच्या काळात पूजा आणि त्यांच्या कुटुंबियांशी संबंधित अनेक प्रकरणे उजेडात आली. त्यामुळे खेडकर कुटुंबाच्या अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान आता पूजा खेडकर राहत असलेल्या वाशिम येथील शासकीय विश्रामगृहात पोलिसांची टीम दाखल झाली आहे. 

वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर याच्या शासकीय विश्रामगृह इथं पोलिसांची टीम दाखल झाली आहे. 15 जुलै रात्री उशीरा पोलिसांनी वाशिमच्या शासकीय विश्रामगृहात प्रवेश केला. साध्या कपड्यातील 6 पोलिसांची टिम आयएएस पूजा राहत असलेल्या ठिकाणी पोहोचली. यातील 3 महिला पोलीस पूजा खेडकर याच्या रूममध्ये दाखल झाल्याचे वृत्त समोर आले आहे. 

रात्री उशिरा 3 महिला पोलीस पूजा खेडकर यांच्या रूममध्ये कोणत्या चौकशीसाठी आल्यात? हे लवकरच स्पष्ट होईल. पूजा खेडकर यांच्या आई-वडीलांचा पोलीस शोध घेत आहे. त्याबद्दल काही विचारणा करण्यासाठी पोलीस आले आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

खेडकर कुटुंबाचा शोध सुरु 

पूजा खेडकर यांच्या आईचा पिस्तूल हातात घेऊन मजूरांना धमकावण्याचा व्हिडीओ समोर आला होता. वडिलांनीदेखील पदाचा गैरवापर केल्याचा आरोप केला जातोय. या पार्श्वभूमीवर तिच्या कुटुंबियांशी कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नसल्याचं पुणे पोलिसांचं म्हणणं आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या खेडकर कुटुंबातील सात जणांचा शोध घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेची तीन पथकं तयार केलीत. पौड पोलिसांच्या मदतीने खेडकर कुटुंबाचा शोध घेतला जातोय. या सर्वांचे मोबाईल फोनही स्वीच ऑफ असल्याचं पोलीसांचं म्हणणंय. पुणे पोलिसांनी रविवारी खेडकर कुटुंबाच्या पुण्यातील बाणेर भागातील बंगल्यात जाऊन तपासण्याचा प्रयत्न केला. मात्र बंगल्याचं गेट बंद असल्याचं आढळून आल्यानंतर पोलिसांनी या बंगल्याचं चित्रीकरण केलं.

उत्पनाचा खोटा पुरावा?

वादग्रस्त आयएएस अधिकारी डॉ. पूजा खेडकर यांनी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठीही नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट सादर केलं होतं. 8 लाखाच्या आत उत्पन्न असलेल्यांनाच ही सुविधा असते. अशावेळी आपल्या खऱ्या उत्पन्नाची माहिती लपवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. पूजा खेडकर यांनी 2007 मध्ये पुण्यातील काशीबाई नवले मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएससाठी प्रवेश घेताना NT - 3 म्हणजेच भटक्या जमातींसाठी आरक्षित असलेल्या कोट्यातून प्रवेश घेतला.

दरम्यान, पूजा खेडकरांनी पुण्यातील जिल्हा रुग्णालयातून देखील अपंगत्व प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रयत्न केला होता. शारीरिक दृष्ट्या विकलांग म्हणजेच कुठल्यातरी व्यंगाच्या कारणावरून हालचालींवर मर्यादा येत असल्याबाबतचं प्रमाणपत्र मिळावं यासाठी त्यांनी अर्ज केला होता. त्यानुसार त्यांची 23 ऑगस्ट 2022 रोजी वैद्यकीय तपासणी झाली. त्यानंतर 11 ऑक्टोबर 2022 रोजी त्यांची विनंती फेटाळण्यात आल्याचं त्यांना औंध जिल्हा रुग्णालयाकडून लेखी कळवण्यात आलं.