मुंबई : पुणे येथे झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर भाजप नेते किरीट सोमय्या आधीच आक्रमक झाल्याचे दिसत आहेत. आज सोमैया यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. उद्धव आणि आदित्य ठाकरे यांनी पैशांसाठी मुंबईकर आणि पुणेकरांचा जीव धोक्यात घातला, असा आरोप सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत केलाय.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (PMRDA) सप्टेंबर २०२० मध्ये मॅनेजमेंट सर्व्हिसेस हेल्थ केअर कंपनीला यापुढे कोणतेही काम देऊ नये असे आदेश काढले. शिवसेना नेते संजय राऊत यांचे पार्टनर सुजित पाटकर यांची मॅनेजमेंट सर्व्हिसेस हेल्थ केअर कंपनी आणि लाइफलाइन हॉस्पिटल आहे.
शिवाजीनगर इथे या कंपनीने कोविड सेंटर उभे केले. या कोविड सेंटरमध्ये अनेक मृत्यू झाले, एका पत्रकाराचा मृत्यू झाला. त्यामुळे या कंपनीला सरकारने ब्लॅक लिस्ट केले. त्यामुळे हे आदेश काढण्यात आले होते. मात्र, ही कंपनी ब्लँक लिस्टमध्ये असूनही वरळी एनएससीआय कोविड सेंटरचे काम या कंपनीला दिले.
PMRDA चे अध्यक्ष मुख्यमंत्री आहेत. आदित्य ठाकरे यांच्यामार्फत संजय राऊत यांनी हे काम करून घेतले. त्यामुळे ठाकरे सरकारचा हा कोविड सेंटर घोटाळा आता 'बाप बेटे का कोविड सेंटर घोटाळा' असल्याचा आरोप त्यांनी केलाय. तसेच, कोविड सेंटर घोटाळ्याची चौकशी सीबीआयमार्फत झाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केलीय.
मी आयुष्यात कधी विडी, सिगारेटची नशा केली नाही. बिअर प्यायलो नाही. अंडही खाल्लं नाही. पण, माझ्यात नशा आहे उद्धव ठाकरेंच्या माफियागीरीला संपवण्याची, माझ्यात नशा आहे महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेला लुटणाऱ्या आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्याकडून पैसे आणण्याची, ठाकरे सरकारच्या ठोकशाहीला ठोकण्याची माझ्यात नशा आहे असं त्यांनी म्हटलंय.