निलेश वाघ, नांदगाव : राज्यात सर्वत्र पिण्याच्या पाण्याची समस्या असतांना केवळ सूड उगविण्यासाठी पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत विषारी औषध टाकण्याचा प्रकार नांदगाव तालुक्यातील साकोरा गावात घडला आहे. या घटनेनंतर पाणीटंचाईमुळे माणुसकी संपत चालल्याची भावना व्यक्त होत आहे.
राज्यावर सध्या पाणीटंचाईचे संकट आहे. नाशिकच्या नांदगाव आणि मनमाड परिसरात तर पिण्याच्या पाण्याची दाहकता मोठी आहे. ग्रामीण भागात तर विहिरींना तळ गाठल्याने हंडाभर पाण्यासाठी महिला आणि अबालवृद्धांना पायपीट करावी लागत आहे. अनेक शेतकऱ्यांनी विहिरीतील पाणी पिण्यासाठी साठवून ठेवले आहे. त्यावर आपली आणि जनावरांची तहान भागवत आहेत.
नांदगाव तालुक्यातील साकोरा गावातील शेतकरी शांताराम बोरसे यांनी आपल्या मालकीच्या विहिरीत पिण्यासाठी पाणी साठवून ठेवले होते. मात्र अज्ञात समाजकंटकांनी सूड उगविण्यासाठी चक्क विहिरीच्या पाण्यात विषारी औषध टाकून पाणी खराब करून माणुसकीला काळीमा फासण्याचं काम केलं आहे. शांताराम बोरसे नेहमीप्रमाणे विहिरीवर पाणी आणण्यासाठी विहिरी गेले असता विहिरीचे पाणी दूषित झाल्याचे लक्षात आले. विषारी औषधांचे खाली डब्बे विहिरीच्या पाण्यावर तरंगताना दिसले. विशेष म्हणजे पाण्याला दुर्गंधी येत होती तर पाण्यातील जीवजंतू मृत अवस्थेत आढळून आले. त्यामुळे पाण्यात अज्ञात व्यक्तीने विषारी औषध टाकल्याचा अंदाज आल्याने बोरसे यांनी हा प्रकार ग्रामस्थांना सांगितला आणि नांदगाव पोलिसात अज्ञात व्यक्तिविरोधात तक्रार दाखल केली आहे.
विहिरीच्या पाण्यात विषारी औषध टाकल्याचा प्रकाराने गावात खळबळ उडाली असून पाणीटंचाईमुळे माणूस खालच्या पातळीला पोहचला असून भीषण पाणीटंचाईच्या काळात पिण्यासाठी विहिरीत साठवून ठेवलेल्या पाण्यात विषारी औषध टाकण्याचा प्रकाराने माणूसातील माणूसपण संपत चालल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
विषारी औषध टाकल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस पाण्यात विष टाकणाऱ्याचा शोध घेतीलही पण पाणीटंचाईमुळे माणूसकी लयास जात असल्याचे या घटनेवरून अधोरेखित होत आहे. त्यामुळे भविष्यात पाणीटंचाईमुळे आणखी काय काय घटना घडतील हे सांगता येणार नाही.