Uddhav Thackeray News : ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये उद्धव ठाकरेंचा मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये भाषण करताना उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची नक्कल केली. मिंधे सरकारची पापं सांगायला दिवसही कमी पडतील, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी समाचार घेतला. त्यांची पापं उघडी करावीच लागतील. त्यांनी आता यात्रा सुरु केल्या आहेत, त्यांना यात्रेला पाठवून द्या असं आवाहनही उद्धव यांनी यावेळी केलं.
लाडकी बहिण योजनेवरून उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधलाय. पंधराशे रुपये कसले देता. पंधरा लाख देणार होता त्याचं काय झालं....वरचे शून्य कुठे गेले? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. विधानसभेला आपली लढाई महाराष्ट्रद्वेष्ट्यांसोबत होणार आहे. ही लढाई ईर्षेनं लढायची आहे असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं. या निवडणुकीत तोतयांची वळवळ पूर्ण थांबवायची आहे.
उद्धव ठाकरे यांचा ठाण्यात मेळावा पार पडला यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नाव न घेता टीका केली. हे नाग नाही मांडुळ असल्याचा घणाघात ठाकरेंनी यावेळी केला. चोर ‘धनुष्यबाण’ घेऊन समोर आला आहे, मशालीची धग काय असते आता त्याला दाखवायचीय. जोरजबरदस्ती, पैशांचा वापर होऊनसुद्धा साडेपाच लाख ठाणेकर आपल्यासोबत उभे राहिले; ह्याचा मला अभिमान आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी ठाण्यातील मेळाव्यातून शिंदेंवर निशाणा साधलाय.. सापांचे फणे ठेचण्यासाठी कालच आलो असतो, मात्र, विधानसभेत सापांचे फणे ठेचणार असल्याचं वक्तव्य संजय राऊतांनी केलंय.. तर ठाण्यातील सगळे सिनेमे काढताय, मलाही 'नमक हराम 2' चित्रपट काढायचा असून त्याची स्क्रिप्ट तयार असल्याचं त्यांनी म्हटलंय... महाराष्ट्राला उद्धव ठाकरेंची गरज आहे, दिल्लीच्या तोंडाला फेस आणला तोच आमचा फेस असून मुख्यमंत्री पदासाठी मविआचा चेहरा हे उद्धव ठाकरेच आहे, असं वक्तव्य संजय राऊतांनी केलंय.. ते ठाण्यातील ठाकरे गटाच्या मेळाव्यात बोलत होते...
ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यात मनसे कार्यकर्त्यांनी राडा घातला. यावेळी ठाकरेंच्या ताफ्यासमोर नारळ, बांगड्या आणि टोमॅटो फेकले. तसेच त्यांच्या ताफ्यावर शेण फेकूनही मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार राडा घातला. यानंतर राडा घालणा-या मनसेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.