मोठी बातमी । बारामतीत होम क्वारंटाईन नागरिकांचा पोलिसांवर हल्ला, १४ जण ताब्यात

कोरोनाचे संकट असल्याने संपूर्ण राज्यात संचारबंदी आहे.  

Updated: Mar 27, 2020, 08:28 PM IST
मोठी बातमी । बारामतीत होम क्वारंटाईन नागरिकांचा पोलिसांवर हल्ला, १४ जण ताब्यात title=

बारामती : कोरोनाचे संकट असल्याने संपूर्ण राज्यात संचारबंदी आहे. होम कोरोटईन असलेल्या लोकांना बाहेर फिरू देऊ नये, असे सांगणाऱ्या युवकाला काही जणांनी मारहाण केली. त्यानंतर तेथे गेलेल्या पोलीस पथकावर बारामती शहरातील काही जणांनी जोरदार हल्ला चढवला. होम क्वारंटाईन नागरिकांचा पोलिसांवर हल्ला केल्याने संताप व्यक्त होत आहे. हल्ला करणारे १४ जण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या हल्ल्यात पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्यासह तीन अधिकारी आणि सहा कर्मचारी जखमी झाले आहेत. 

हल्ल्यात अनेकांच्या हाताला जोरदार मार लागला असून अनेकांच्या डोक्यात काठ्या घालण्यात आल्या आहेत तर काही जणांना दगडाने देखील मारहाण करण्यात आलेली आहे. या हल्ल्यात पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी शेंडगे, फौजदार पद्मराज गंपले , योगेश शेलार, पोलीस कर्मचारी पोपट कोकाटे, सिद्धेश पाटील, पोपट नाळे, महिला पोलिस कर्मचारी रचना काळे, आणि स्वाती काजळे आदी जखमी झालेत.

हल्ल्यामध्ये पोलिसांच्या पायाला, हाताला आणि डोक्याला दुखापत झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दहा नागरिक आणि चार महिलांना  ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. या हल्ल्यानंतर जळोची परिसरामध्ये वातावरण तणावपूर्ण शांत असून या ठिकाणी राज्य राखीव पोलिस दलाची एक तुकडी पाचारण करण्यात आली आहे.