पालघरवर आमचाच क्लेम - हितेंद्र ठाकूर

पालघर पोटनिवडणुकीसाठी आमच्या पक्षाचं काम केलेला आमचाच उमेदवार असेल, आम्हाला उमेदवार आयात-निर्यात करण्याची गरज नाहीय

Updated: May 8, 2018, 10:37 PM IST

पालघर : पालघरमधली बहुचर्चित अशी लोकसभेची पोटनिवडणूक आम्ही लढवणार आणि आम्हीच जिंकणार, असा दावा बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूर यांनी केलाय. पालघरमध्ये आमचा सर्वात मोठा पक्ष आहे... त्यामुळे या जागेवर आमचा क्लेम आहे, असं वक्तव्यही ठाकूर यांनी यावेळी केलंय.  इतकंच नाही तर बहुजन विकास आघाडी ही पोटनिवडणूक लढवणार आणि आमचाच खासदार निवडून येणार, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केलाय. 

यावेळी, पालघर पोटनिवडणुकीसाठी आमच्या पक्षाचं काम केलेला आमचाच उमेदवार असेल, आम्हाला उमेदवार आयात-निर्यात करण्याची गरज नाहीय, असा टोलाही त्यांनी शिवसेना - भाजपला लगावलाय. चिंतामण वनगा हे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते होते... विरोधकांशीही त्यांचे चांगले संबंध होते. स्वछ प्रतिमा आणि लोकांशी चांगले संबंध होते... हा झाला वडिलांचा भाग, पण मुलाच्या बाबतीत ते घडेल असं नाही... वनगा कुटुंबियांच्या नाराजीचा भाजपला फटका बसेल... आयात उमेदवारांना स्थानिक कसे स्वीकारतील? असंही त्यांनी म्हटलंय. 

आमच्या पक्षात उमेदवारी साठी 6 ते 7 जण इच्छुक असल्याचंही त्यांनी म्हटलंय. शिवाय, भाजपसोबत सत्तेत असणं हा वेगळा भाग आहे. याचा अर्थ कुणी आम्हाला गृहीत धरू नये... असा इशारा भाजपला देत  10 तारखेला आमच्या पक्षाचा उमेदवार अर्ज भरेल अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

बहुजन विकास आघाडी, भाजप आणि काँग्रेस इथं नॅचरल पक्ष आहोत... गेली अनेक वर्षे निवडणूक लढवंत आहोत... शिवसेना इथं मध्येच आलीय.