आईनं दसऱ्याले पुरनपोळ्यापण नाही केल्या; लहानग्यानं केविलवाण्या पत्रातून मुख्यमंत्र्यांना घातली साद

साहेब, अनुदानाचे पैसे लवकर द्या, आई दिवाळीला पोळ्या करेल, तुम्हीही या!

Updated: Oct 10, 2022, 12:23 PM IST
आईनं दसऱ्याले पुरनपोळ्यापण नाही केल्या; लहानग्यानं केविलवाण्या पत्रातून मुख्यमंत्र्यांना घातली साद title=

मुंबई : राज्यात सत्तांतरं होत असताना शेतकऱ्यांची (Farmer) परिस्थिती मात्र जैसे थे अशीच आहे. सर्वांना अन्न धान्य पोहोचवणाराच बळीराजावरच अनेकदा उपासमारीची वेळ आल्याचं आपण पाहिलं देखील असेल. अशातच गेल्या काही वर्षांपासून अतिवृष्टीने हातातोंडाशी आलेलं पीक हिसकावून घेतलं आहे. काही वेळा नुकसान भरपाई किंवा अनुदान देखील वेळेत मिळत नाही. या सर्वांचा परिणाम शेतकऱ्यांच्या संपूर्ण कुटुंबाला भोगावा लागतोय. अशाच एका लहान चिमुकल्याने  पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknat Shinde) यांच्यापुढे आपली व्यथा मांडलीय.  हे पत्र सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल सुद्धा होत आहे. सणासुदीच्या दिवशी गोडधोड खायला मिळावे यासाठी शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान द्यावे,असे भावनिक पत्र या चिमुकल्याने मुख्यमंत्र्यांना पाठवंलय. सहावीतील विद्यार्थ्यांने मुख्यमंत्र्यांना हे पत्र लिहील्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर आहे.

काय म्हटंलय पत्रात?

हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील इयत्ता सहावीत शिकणाऱ्या प्रताप कावरखे  पावसामुळे सोयाबीनचे पीक गेल्याने दसऱ्याला पुरणाच्या पोळ्या खायला मिळाल्या नाहीत,अशी खंत पत्रात व्यक्त केलीय.

"माझे बाबा शेती करतात. आमच्या घरी शेती कमी आहे असं बाबा म्हणतात. मी बाबांना म्हणालो की गुपचूप खायला पैसे द्या. यावरुन ते भांडण करतात आणि म्हणतात की, यावर्षी सगळं सोयाबीन गेलं आता वावर विकतो आणि तुला दहा रुपये देतो. आईने दसऱ्याला पुरणाच्या पोळ्या पण नाही दिल्या. आई म्हणते इथे विष खायला पैसे नाहीत. वावरातील सोयाबीन पण गेले. बाबा दुसऱ्याकडे कामाला जातात. मी आईला म्हणालो की दिवाळीला आपल्याला पोळ्या कर. तर ती म्हणते बॅंकेत अनुदान आलं की करु. सणाला आमच्या घरी पोळ्या नाहीत. पैसेही नाहीत. आम्हाल घरही नाही. आम्हाला काहीच नाही. मी बाबांसोबत भांडण केले की आई म्हणजे जवळच्या गावात शेतकऱ्याच्या पोराने पैसे मागितले म्हणून त्याने फाशी घेतली. आता मी बाबांकडे पैसे मागत नाही. साहेब आमचे घर पाहा. तुम्ही या. अनुदानाचे पैसे लवकर द्या. मग दिवाळीला आई पोळ्या करेल मग तुम्ही पण या पोळ्या खायला साहेब. तुमचा आणि बाबाचा लाडका प्रताप कावरखे वर्ग 6 जि.प. शाळा गोरेगाव हिंगोली," असं पत्र या चिमुकल्याने लिहिलं आहे.

hingoli farmer son letter sent CM eknath shinde for Pay the grant money early