मारुतीच्या दर्शनाला निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला; भरधाव पिकपने चिरडल्याने 4 ठार

Hingoli Accident News : हिंगोलीत भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. या भीषण अपघातात चार भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे तर चारजण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केलं आहे.

आकाश नेटके | Updated: Feb 24, 2024, 09:39 AM IST
मारुतीच्या दर्शनाला निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला; भरधाव पिकपने चिरडल्याने 4 ठार title=

गजानन देशमुख, झी मीडिया, हिंगोली : हिंगोलीत देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातला आहे. देवदर्शनासाठी जात असताना भरधाव पिकअपने चिरडल्याने चार भाविकांचा जागीच मृत्यू झाला. तर चार भाविक हे गंभीर जखमी झाले आहेत. हिंगोलीच्या माळहिवरा येथे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांनासोबत हा सगळा प्रकार घडला.

हिंगोली ते कनेरगावनाका मार्गावर माळहिवरा शिवारात हा सगळा प्रकार घडला. हिंगोली वाशिम रोडवर माळहिवरा फाटीवरून हे भाविक मारुतीच्या दर्शनासाठी पायी निघाले होते. मात्र त्याच वेळी पाठीमागून येणाऱ्या पिकअपने त्यांना जोराची धडक दिल्याने ही दुर्घटना घडलीय. जखमींना उपचारासाठी हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हे सर्व भाविक हिंगोली जिल्ह्यातील सीरसम येथील रहिवासी असून माळहीवरा येथे मारुतीच्या दर्शनासाठी निघाले होते. त्याचवेळी हा अपघात घडला.

हिंगोलीतील दर शनिवारी भाविक  सिरसम येथून पायी चालत माळहिवरा फाटा येथील हनुमान मंदिरात दर्शनासाठी येतात. नेहमीप्रमाणे हे भाविक शनिवारी पहाटेच सिरसम येथून माळहिवरा येथे पायी चालत निघाले होते. माळहिवरा शिवारात हे सर्व भाविक आले असताना हिंगोलीकडून अमरावतीकडे भाजीपाल्याचे रिकामे कॅरेट घेऊन जाणाऱ्या पिकअप वाहनाने भाविकांना पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की चौघांचा जागीच मृत्यू झाल. तर चारजण गंभीर जखमी आहेत. 

या अपघातात मनोज गोपाळराव इंगळे (वय 39), बालाजी बाबुराव इंगळे (वय 32), सतिश शंकरराव थोरात (वय 27), वैभव नंदू कामखेडे (वय 22) यांचा मृत्यू झाला. तर जगन प्रल्हाद अडकिणे, उत्तम संतोष गिरी, संतोष सिताराम वसू, राजकुमार भिकाजी घाटोळकर हे जखमी झाले आहेत. सर्व जखमींना हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला उपचारासाठी नांदेड येथे हलवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे जखमींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या अपघातानंतर पिकअप चालकाला ताब्यात घेण्यात आले असून चालकाला डुलकी लागल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

वसईत वयोवृद्धांना ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन आरोपींना अटक

वसई पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात राहणारे सिल्वेस्टर परेरा हे 17 फेब्रुवारीला पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले. तेव्हा त्यांच्या भावाच्या घराबाहेर 2 अनोळखी मुले व 2 अनोळखी महिला आपपसात भांडण करून आरडाओरड करीत होते. सिल्वेस्टर व त्यांचे भाऊ समजण्यासाठी गेले असता त्या तिघांनी दोघां वृद्धानाचं जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने मारहाण केली व पळ काढला. या बाबतची तक्रार वसई पोलिसांकडे प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन अर्नाळा नंदाखाल परिसरातून त्यांना अटक केली आहे.