कोरोनामुक्त हिंगोलीत राज्य पोलीस दलाच्या जवानांना कोरोना

आरोग्य विभाग आणि प्रशासना समोर उपाय योजना करण्याचे आव्हान 

Updated: Apr 22, 2020, 06:14 AM IST
कोरोनामुक्त हिंगोलीत राज्य पोलीस दलाच्या जवानांना कोरोना title=

गजानन देशमुख, झी मीडिया, हिंगोली : कोरोनामुक्त झालेल्या जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव झालाय. हिंगोली येथे बल गट क्रमांक १२ ची राज्य राखीव दलाच्या तुकडीत हा गंभीर प्रकार समोर आला आहे. मुंबई, नाशिक मधील रेड झोनमध्ये बंदोबस्तासाठी असलेल्या राज्य पोलीस दलाच्या जवानांना कोरोनाची लागण झाली आहे. 

दोन दिवसांपूर्वी नाशिक आणि मुंबई येथे बंदोबस्तासाठी १९४ अधिकारी आणि जवान गेले होते. हिंगोलीला परतलेत. रेड झोनमध्ये कर्तव्य बजावून आल्याने १९४ जवानांचा थ्रोट स्वॅप घेतला होता. त्यापैकी १०१ जवानांचा चाचणी अहवाल औरंगाबादच्या शासकीय महाविद्यालयाने पाठविण्यात आले. 

यापैकी ६ जवानांना कोरोनाची लागण झाली असल्याचे उघड झाले. आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे बंदोबस्थासाठी गेलेल्या ५ जणांचा तर मुंबईत बंदोबस्थासाठी गेलेल्या एका जवानांचा समावेश आहे. त्यांना हिंगोली जिल्हा रुग्णालयात आयसोलेशन वार्डात ठेवण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

त्यांची प्रकृती चांगली असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने दिली जातेय. मुंबई, मालेगावसारख्या रेड झोनमध्ये बंदोबस्त करून आल्यानंतर या सर्व जवानांचे स्वॅब घेण्यात आले होते. या कोरोना बाधितापासून आणखीन काही जवानांना कोरोनाची लागण तर झाली नसेल ना ? अशी भीती व्यक्त केली जात आहे. 

आरोग्य विभाग आणि प्रशासना समोर उपाय योजना करण्याचे आव्हान आहे. वसमत येथील ४९ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. ते बरे झाल्या नंतर त्यांना जिल्हा रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली होती.

त्यानंतर हिंगोली जिल्हा कोरोनामुक्त झाला होता. पण आता सहा जवानाला कोरोनाची लागण झाल्यामुळे हिंगोली जिल्ह्यात खळबळ माजलीये. नागरिकांनी घाबरू जाऊ नये आणि घराबाहेर पडू नये असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने केले जात आहे.