कोरोना रुग्णांसाठी हाय फ्लो नोझल मशीन ठरतेय संजीवनी

रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही वाढतं...

Updated: Aug 18, 2020, 01:41 PM IST
कोरोना रुग्णांसाठी हाय फ्लो नोझल मशीन ठरतेय संजीवनी  title=
संग्रहित फोटो

नांदेड : नांदेडमध्ये कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत असताना मृत्यूंचा आकडाही वाढतो आहे. मात्र याच दरम्यान नांदेडमधून एक दिलासादायक बाब समोर येत आहे. कोरोनाच्या अत्यवस्थ रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी शासकीय रुग्णालयांमध्ये हाय फ्लो नोझल मशीन उपलब्ध झाल्या आहेत. या हाय फ्लो नोझल मशीन कोरोना रुग्णांसाठी संजीवनी ठरत आहेत. 

कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना हाय फ्लो नोझल मशिनमुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. कोरोना रुग्णाला सर्वाधिक ऑक्सिजनची गरज भासते. पण सध्याच्या ऑक्सिजन प्रणालीमुळे एका रुग्णाला प्रति लिटर केवळ 4 ते 6 मिनिटं ऑक्सिजन पुरवठा केला जाऊ शकतो. मात्र हाय फ्लो नोझल मशिन्समुळे हा वेग वाढवता येणार आहे. नांदेड जिल्ह्यात 28 हाय फ्लो नोझल मशिन उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. 

या मशिनद्वारे रुग्णाला 40 ते 60 लिटर्स ऑक्सिजन दिला जाऊ शकतो. त्यामुळे ज्या रुग्णाला 4 ते 6 लिटर ऑक्सिजन देण्यात येत होता, तो आता 40 ते 60 लिटर दिला जाऊ शकत, असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांकडून देण्यात आली आहे. इनक्यूबेटरद्वारे कृत्रिम श्वास घेताना रुग्णाला प्रचंड त्रास होतो. मात्र हाय फ्लो नोझल मशिनमुळे, नाकात केवळ दोन नोझल घालून, वेगाने ऑक्सिजन पुरवठा केला जातो. शिवाय रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही वाढतं. 

राज्यातील शासकीय रुग्णालयात हाय फ्लो नोझल मशिनचा पुरवठा करण्यात आला आहे. भरमसाठ लोकसंख्या असेलल्या भारतात कोरोनामुळे आरोग्य व्यवस्था सक्षम करण्याकडे लक्ष दिलं जातं आहे.