शितल आमटे आत्महत्या : विकास आमटेंना होती पूर्वकल्पना ?

डॉ. शीतल आमटे यांना बंदुकीचा परवाना न देण्याची डॉ.विकास आमटे यांची पोलिसांकडे विनंती

Updated: Dec 9, 2020, 08:48 PM IST
शितल आमटे आत्महत्या : विकास आमटेंना होती पूर्वकल्पना ? title=

आशिष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर : डॉ. शीतल आमटे यांच्या आत्महत्येनंतर राज्यातील सामाजिक क्षेत्रातून दु:ख व्यक्त होतंय. डॉ. शीतल आमटे यांनी हा धक्कादायक निर्णय घेण्यामागे काय कारण असावं ? याची सर्व स्तरातून चर्चा सुरु आहे. दरम्यान यासंदर्भात एक माहिती समोर येतेय. डॉ.विकास आमटे यांना पूर्वकल्पना असल्याचा संशय आहे. असे वाटण्यामागचे कारणही तसेच आहे.

डॉ. शीतल आमटे यांना बंदुकीचा परवाना न देण्याची डॉ.विकास आमटे यांनी पोलिसांकडे विनंती केली होती. हेमलकसा येथे मुक्कामाला असताना विकास आमटे यांनी भामरागड पोलिसांना त्यासाठी पत्र दिले होते. त्या पत्राची एक प्रत वरोरा पोलीसांना देखील देण्यात आली होती.

२८ नोव्हेंबर म्हणजे शीतल आमटे यांच्या मृत्यूच्या २ दिवस आधी भामरागड येथून एक पोलीस कर्मचारी हे पत्र घेवून वरोरा उपविभागीय पोलीस कार्यालयात आला होता. मात्र शीतल आमटे यांनी बंदुकीचा परवाना मागितल्याची वरोरा पोलिसांकडे कुठलीच नोंद नाही. 

डॉ.विकास आमटे यांच्या जबाब यावर अधिक प्रकाश पडू शकतो पण अजूनही विकास आमटे आणि त्यांच्या कुटुंबियांचे जबाब पोलिसांनी नोंदविलेले नाहीत. आतापर्यंत करजगी कुटुंबियांसह २० लोकांचे पोलिसांनी जबाब नोंदविले असून लवकरच आमटे कुटुंबियांचे जबाब नोंदविणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

डॉ.शीतल आमटे यांचा व्हिसेरा रिपोर्ट आणि त्यांच्या मोबाईल, लॅपटॉप आणि टॅबचा सायबर रिपोर्ट देखील पोलिसांना मिळालेला नाही. व्हिसेरा आणि सायबर रिपोर्ट मिळाल्यावर या प्रकरणाच्या तपासाला अधिक गती येण्याची शक्यता आहे.

कुत्र्यांसाठीचे इंजेक्शन टोचून आत्महत्या केली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. घरच्या पाळीव कुत्र्यासाठी इंजेक्शन मागवण्यात आले होते. नागपूरच्या फार्मसिस्टच्या चौकशीतून ही धक्कादायक बाब समोर आली. त्यांना ५ इंजेक्शन मागवले होते. त्यापैकी एक इंजेक्शन त्यांच्या मृतदेहाबाजूला तुटलेल्या अवस्थेत सापडलं असल्याचं सांगण्यात येत आहे. 

तर कुत्र्यांच्या इंजेक्शनमुळे माणसाचा मृत्यू होतो का, तो किती प्रमाणात घ्यायला हवा, शीतल यांच्या व्हिसेरा अहवालात इंजेक्शनचे अंश सापडतात का? या सर्व गोष्टींचा तपास आता सुरू आहे. डॉ. शीतल आमटे या आनंदवनच्या महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या. 

गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावात असल्याची माहिती आमटे कुटुंबीयांनी नुकतीच दिली होती. या वादावर तोडगा काढण्याच्या उद्देशाने डॉ. विकास आणि डॉ. भारती आमटे हे हेमलकसा प्रकल्पात गेले होते. त्यावेळी शीतल या आपल्या खोलीत एकट्याच होत्या. त्याचवेळी हा प्रकार घडला.