मुंबई : मुंबईत पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरीमध्ये पावसाचा जोर कायम राहणार आहे. बदलापूरमध्ये रुळांवर पाणी साचले आहे. त्यामुळे कल्याणपुढे जाणारी लोकल वाहतूक ठप्प आहे. तर मुसळधार पावसामुळे ईस्टर्न फ्रीवेवरील वाहतूक काही काळ मंदावली होती. मुंबईसह उपनगरांना पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. तर पश्चिम आणि पूर्व उपनगरांमध्ये पावसाचा जोर जास्त होता. दादर, जुहू, कुर्ला या ठिकाणी पाऊस धो धो बरसला.
#WATCH Mumbai: Roads in Matunga area water-logged, after heavy rainfall in the city. #Maharashtra pic.twitter.com/O8TUKmHNRc
— ANI (@ANI) July 26, 2019
गोरेगावच्या एस व्ही मार्गावर पाणी आल्यामुळे वाहतुकीला फटका बसला. लोकल वाहतूक काहीशी मंदावली. मध्य रेल्वेची लोकलसेवा १५ ते २० मिनिटं उशिरानं धावत आहे. पावसाचा विमान वाहतुकीवरही परिणाम झाला असून विमानांचं उड्डाण अर्धा तास उशिरानं आहे. आजच्या पावसानं २६ जुलै २००५च्या आठवणी ताज्या केल्या. सलग झालेल्या पावसानं मुंबईकर थोडेसे धास्तावलेले दिसले.
मुंबईत दोन ते तीन तास जोरदार पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे ईस्टर्न फ्रीवेवरील वाहतूक काही काळ मंदावली. ईस्टर्न फ्रीवेच्या बोगद्यात वाहनांच्या तब्बल दोन किमीपर्यंत रांगा लागल्या होत्या. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली. घरी परतताना पावसाचा वाहतुकीला फटका बसल्यामुळे नोकरदारांना मनस्ताप सहन करावा लागला.
रायगड जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. दुपारपासून दक्षिण रायगडात पावसाचा जोर वाढलाय. महाड, माणगाव, तळा, पोलादपूर, म्हसळा भागात जोरदार पाऊस कोसळतोय. सावित्री आणि गांधारी नदीच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ झालीये. मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला.
कोकणातील रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. नऊ तालुक्यांपैकी सात तालुक्यांत दमदार पाऊस झाला आहे. चिपळूण आणि खेड तालुक्यात नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. चिपळूण येथे वाशिष्ठी नदीचे पाणी बाजारपेठेत घुसले आहे. तर खेडमधील जगबुडी नदी पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दापोली, मंडणगड, संगमेश्वर या तालुक्यात जोरदार पाऊस झाला आहे.