पाऊस नसल्याने राज्यात 'या' ठिकाणी मोठे संकट उभे

महाराष्ट्र राज्यात सगळीकडे पाऊस कोसळत आहे. मात्र, काही ठिकाणी पाऊस पडत नसल्याने मोठे संकट आहे.

Updated: Jul 26, 2019, 10:35 PM IST
पाऊस नसल्याने राज्यात 'या' ठिकाणी मोठे संकट उभे title=

मुंबई, पुणे, येवला, मलागाव :  महाराष्ट्र राज्यात सगळीकडे पाऊस कोसळत आहे. मात्र, काही ठिकाणी पाऊस पडत नसल्याने मोठे संकट निर्माण झाले आहे. जुलै महिना संपत आला तरी पुणे जिल्ह्यात १८७ टँकरने गावांना पाणीपुरवठा केला जात. गेल्या काही दिवसात झालेल्या पावसामुळे टॅंकरची संख्या घटली असली तरी ९४६ वाड्यावस्त्यांवर ३ लाख ४० हजार लोकसंख्या टँकरच्या पाण्यावर विसंबून आहे. सर्वाधिक ६६ टॅंकर इंदापूर तालुक्यात सुरू आहेत. त्या खालोखाल बारामतीत ४४, दौंडमध्ये ३१, शिरूर २४,  पुरंदर १२, आंबेगाव ५ आणि जुन्नरमध्ये दोन टँकर पाणीपुरवठा करत आहेत. 

पाण्याचे भीषण संकट

येवला जिल्ह्यात ओझरखेड धरण आटल्यानं चांदवड शहरावर पाण्याचं भीषण संकट उभं ठाकलंय. महिलांना हंडा दोन हंडे पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आलीये. शहरात पंधरा ते वीस दिवसांनी आणि तोदेखील अनियमित पाणी पुरवठा होतोय. नगर परिषदेनं शहरात टँकरनं पाणी पुरवठा सुरु करावा, अशी मागणी होतेय.. चांदवड शहरातील तर नागरिकांनी पाण्याचं काटेकोरपणे नियोजन करावं आणि बांधकामं काही काळापुरती बंद करावीत, असं आवाहन नगर परिषदेनं केलंय. 

अत्यल्प पाऊस, पाणीटंचाई

मालेगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गिरणा आणि चणकापूर धरण क्षेत्रात अत्यल्प पाऊस पडल्याने त्याचा परिणाम मालेगाव शहराच्या पाणी पुरवठ्यावर जाणवू लागलाय. शहरात टंचाई जाणवू लागल्याने  महापालिकेने कपात सुरु केलीय. आजपासून शहराला आता तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. नागरिकांनी  पाणी जपून वापरण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलंय. त्यामुळे लवकर पाऊस झाला नाही तर मालेगाव शहराचा पाण्याचा प्रश्न गंभीर होईल.

शेतकऱ्याने पिकावर नांगर फिरवला

पावसाळ्याचे निम्मे दिवस संपले तरी जोरदार पाऊस न झाल्याने हताश शेतकऱ्यांनी उभ्या पिकावर नांगर फिरवलाय. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील ही घटना आहे. शेतकऱ्यांनी पेरणी केली, जमिनीतून पिके अंकुरली मात्र पावसाने दडी मारल्याने आणि कडक ऊन पडल्याने परिसरातील शेतकऱ्यांची पिकं करपली, उधार उसनवारी करून शेतकऱ्यांनी यंदा बी बियाणे आणि खतासाठी तजवीज केली, मात्र, पावसाअभावी पिके उद्ध्वस्त झालीय. पाऊस नसल्याने शेतकऱ्यांनी पिकांवर नांगर फिरवला.