पणजी, सिंधुदुर्ग : गोवा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पावसाचा हा जोर पुढील दोन दिवस असाच राहील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तसेच हवामान खात्याने बुधवारी गोव्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. आज कोसळलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे गोव्यातील अनेक विमानांचे उड्डान रखडे तर काहींची अन्यत्र वळविण्यात आले. त्यामुळे अनेक प्रवाशांना दाबोळी विमानतळावर अडकून राहावे लागले. तर सिंधुदुर्गात गेले दिन दिवसांपासून पाऊस कोसळत आहे. आज मुसळधार पाऊस झाला. संततधार बरसत असलेल्या पावसाचा जोर बुधवारी अधिकच वाढला. धुव्वाधार कोसळणाऱ्या पावसाने रस्ते जलमय झाले असून अनेकांच्या घरात पाणी घुसले आहे. अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. रस्ते तसेच वीज खांबांवर झाडे पडल्याने काही मार्गावरील वाहतूक तसेच वीजपुरवठा खंडित झाला.
गोव्यात पावसाने कहर केला असून संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक भागात पाणी साचल्याने वाहतूक प्रभावित झाली आहे. हवामान खात्याने बुधवारी गोव्यासाठी अलर्ट जारी केला आहे. बुधवार आणि गुरुवारी मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गोव्यात काही भागात अती ते अती मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सिंधुदुर्गातील मालवण, वेंगुर्ला आणि देवगड या तीन तालुक्यांत आतापर्यंत एक हजार मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. देवगड तालुक्यात आतापर्यंत २० दिवसात सर्वाधिक १ हजार २५९ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. मालवणात सखल भागातील घरात पाणी शिरले असून बाजरपेठ भागातील रस्त्यांवर पाणी साचले आहे.
रस्ते तसेच वीज खांबांवर कोसळली झाडे किनारपट्टी भागात अनेक ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. रस्त्यांवर कोसळलेल्या झाडांमुळे काही काळ वाहतूक ठप्प होण्याच्या घटना अनेक मार्गावर दिसून आल्या. तर वीज खांब व वीज तारांवर झाडे कोसळल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. दरम्यान, धुव्वाधार पावसामुळे समुद्रही खवळला असून जोरदार लाटा किनारपट्टीवर धडकत आहेत. पर्यटकांनी समुद्र तसेच समुद्रापासून दूर रहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.