परतीच्या पावसाचा नाशिक जिल्ह्यातील गावांना तडाखा

अचानक आलेल्या पावसामुळे कांद्याच्या रोपांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान 

Updated: Oct 12, 2019, 12:39 PM IST
परतीच्या पावसाचा नाशिक जिल्ह्यातील गावांना तडाखा title=

नाशिक : परतीच्या पावसाने पुन्हा नाशिकच्या कळवण तालुक्यातील रवळजी, देसराणे,मोकभनगी, हिंगळवाडी, पाटविहिर या गावांना तडाखा दिला. अचानक आलेल्या पावसामुळे उन्हाळी कांद्याच्या रोपांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. लावणीला आलेल्या कांदा रोप खराब झाले आहे तर काही ठिकाणी कांदा रोपावर बुरशी, करपा आणि मावा रोगाचा प्रार्दुभाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी कांदा रोप तयार करण्यासाठी शेतात बियाणे पेरलं होतं. मात्र अचानक आलेल्या पावसामुळे ते वाहून गेल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

नाशिक जिल्ह्याला या वर्षी पावसाने अनेकदा झोडपून काढलं आहे. ठिकठिकाणी झालेल्या पावसामुळे नाशिकमधील नदी यंदा चांगलीच भरुन वाहत होती. गेल्या आठवड्यातही नाशिकमध्ये पावसामुळे लोकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. परतीच्या पावसामुळे द्राक्ष, डाळिंब, बाजरी, मका या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा चिंतेत आहे.