विदर्भाला पावसाचा तडाखा; चिमुकल्याचा मृत्यू

यवमतमाळ जिल्ह्यातील केळापूर, पुसद, दारव्हा, दिग्रस, उमरखेड आणि यवतमाळ या सहा तालुक्यांत पावसाने हाहाकार उडवू दिला. 

Updated: Aug 19, 2018, 12:14 PM IST
विदर्भाला पावसाचा तडाखा; चिमुकल्याचा मृत्यू title=

नागपूर: गेले दोन दिवस सुरू असलेल्या पावसाने विदर्भातील काही जिल्ह्यांना चांगलाच तडाखा दिला. फटका बसलेल्या जिल्ह्यांपैकी यवतमाळ, गडचिरोली या जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला. या पावासाने एका चिमुकल्याचा बळी घेतला. तसेच, शेतीचे मोठे नुकसान केले. प्राप्त माहितीनुसार प्रशांत बागडे (वय वर्षे १०) या भंडाऱ्यातील मुलाचा मृत्यू झाला. 

यवतमाळला धुतले

यवमतमाळ जिल्ह्यातील केळापूर, पुसद, दारव्हा, दिग्रस, उमरखेड आणि यवतमाळ या सहा तालुक्यांत पावसाने हाहाकार उडवू दिला. यवतमाळमध्ये सुमारे चार हजार हेक्टरवरील कापूस, सोयाबीन, तूर या पिकांचे पावसाने मोठे नुकसान केले.त्यामुळे या संकटातून आता सावरायचे कसे हा सवाल शेतकऱ्यांच्या मनात सतावतो आहे. तर, दुसऱ्या बाजूला मोठी वित्तहानीही पहायला मिळाली. शेकडो घरांची पडझड झाली. अनेक गावे पुराने वेढली. त्यामुळे जिल्ह्यात साथीच्या रोगानेही डोके वर काढले आहे. कॉलरा, डेंग्यू, अतिसार या रोगांना आळा घालण्यासाठी वैद्यकीय विभाग आणि प्रशासन जोरदार कामाला लागले आहे.

चंद्रपूरलाही मोठा फटका

दरम्यान, या पावसाचा चंद्रपूरलाही मोठा फटका बसला. शेतकऱ्यांची शेकडो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली. तर, कापूस, धान, तूर, सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला. अनेक गावांचा पाणीपुरवठा, विजपुरवठा खंडीत झाला आहे. तर, काहींचा संपर्क तुटला आहे. यात गोंडपिपरी तालुम्क्यातील वेडगाव, पोडसा, सकमुर, सोनापूरचा समावेश आहे.