Heatwave : पालकांनो मुलांना सांभाळा; उष्माघाताने घेतला पाच वर्षांच्या चिमुकलीचा बळी

Heatwave : मार्च महिन्यापासूनच राज्यातील नागरिकांना अवकाळी पावसासह वाढत्या पाऱ्याचा देखील सामना करावा लागत आहे. याच वाढत्या पाऱ्यामुळे हिंगोतील एका चिमुकलीला जीव गमवावा लागला आहे.

आकाश नेटके | Updated: Apr 13, 2023, 10:36 AM IST
Heatwave : पालकांनो मुलांना सांभाळा; उष्माघाताने घेतला पाच वर्षांच्या चिमुकलीचा बळी title=

गजानन देशमुख, झी मीडिया, हिंगोली : राज्यात एकीकडे अवकाळी पावसाचं (Unseasonal rain) संकट असताना आता वाढत्या तापमानामुळे (Heatwave) नागरिकांची चिंता वाढली आहे. एप्रिल महिन्यात अवकाळी पावसाने राज्यात काही ठिकाणी डोकं वर काढलेला असताना उन्हाचा पारा चांगलाच वाढू लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात तापमानात वाढ होऊ लागली असतानाच काही ठिकाणी पारा चाळीशी पार गेला आहे. वाढत्या तापमानामुळे एप्रिल महिन्यापासूनच नागरिकांना उन्हाचे जबर चटके बसू  लागले आहेत. अशातच हिंगोलीत उष्माघाताने एका चिमुकलीचा बळी घेतला आहे. 

 मार्च महिन्यांपासून हिंगोली जिल्ह्यात उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे.वाढत्या पाऱ्यामुळे एका पाच वर्षाच्या चिमुकलीला आपला जीव गमवावा लागलाय. कण्हेरगाव नाका येथील नंदिनी शंकर खंदारे या पाच वर्षांच्या मुलीचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची माहिती वाशिम येथील एका खासगी डॉक्टरांनी पालकांना दिली आहे. कण्हेरगाव नाका येथील शंकर खंदारे यांच्या मुलीला अचानक ताप आणि उलटी जुलाब सुरु झाल्याने गावापासून जवळ असलेल्या वाशिम येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

चिमुकल्या नंदिनीवर वाशिमच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र तीव्र ताप तिच्या डोक्यात गेल्याने तिला उष्माघात झाल्याचा दावा डॉक्टरांनी केला होता. रुग्णालयात नंदिनीवर उपचार सुरु होते. मात्र उपचारादम्यानच नंदिनीची प्राणज्योत मालवली. नंदिनीच्या मृत्यूनंतर गावावर शोककळी पसरली आहे. त्यामुळे आता या जीवघेण्या उन्हापासून वाचण्यासाठी पालकांनी आवश्यक उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे

मुंबईतही अवकाळी पाऊस!

एकीकडे राज्यात तापमान वाढत असताना मुंबईत रात्री पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. वादळी वारा आणि विजांच्या गडगडाटासह मुंबईत पाऊस झाला. विशेषतः मुंबईच्या पश्चिम उपनगरात पावसाने हजेरी लावली होती. वादळी वाऱ्यामुळं काही ठिकाणी झाडे देखील पडली आहेत. तर काही ठिकाणी घरांवरील पत्रे देखील उडून गेले आहेत. या पावसामुळे मुंबईच्या सखल भागात लगेचच पाणी साचल्याचेही पाहायला मिळाले.

दरम्यान, राज्यातील वातावरणात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बदलताना दिसत आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच अनेक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. असे असतानाच गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमानात दिवसेंदिवस वाढ होतानाही दिसत आहे. अनेक ठिकाणी तापमान चाळीशी पार गेले आहे. त्यामुळे सकाळपासूनच नागरिकांना उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. उन्हापासून वाचण्यासाठी अनेक जण शीतपेयांचा वापर करत आहेत.