मुंबई : मुंबईकर उष्णतेच्या लाटेनं हैराण झाले आहेत. बदलत्या ऋतूमानानुसार होळीनंतर उन्हाळा आणखी तापदायक ठरण्याची दाट शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानातील तापमान 40 ते 42 अंशाच्या आसपास असून, गुजरात आणि महाराष्ट्रात बहुतांश शहरांचे विशेषत: कोकणातील अनेक शहरांचे कमाल तापमान 38 ते 39 अंशादरम्यान नोंदवण्यात आले आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे दाखल झालेल्या उष्णतेच्या लाटेनं मुंबईच्या कमाल तापमानात सातत्याने भर घातली आहेत. त्यामुळे मुंबईकर हैराण झाले असून आरोग्य सांभाळा असं आवाहन करण्यात आल आहे.
विदर्भात मार्च महिन्यात होळीपूर्वीच सूर्यनारायणचा तडाखा जाणवू लागलाय. विदर्भात सर्वाधिक तापमान अकोल्यात 42.9 अंश सेल्शिअस नोंदवण्यात आलं. अमरावती, वाशिम, वर्धा इथं 41 अंशांवर पारा गेला. नागपुरात 40.9 अंश सेल्सिअस तापमान होतं.
अकोल्यात मार्च महिन्यापासूनच उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. ((विदर्भात तापमानाचा पारा जवळपास ४० अंशापर्यंत पोहचला आहे. अकोल्यात सुद्धा उन्हाची तीव्रता जाणवत आहे.))मार्च महिन्यात पारा ४३ पर्यंत पोहचल्याने अकोलेकरांची चिंता वाढली आहे.
विदर्भातील तापमान 38 ते 39 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेच्या मोठ्या झळा नागरिकांना बसतायेत. या तापमानापासून बचावासाठी नागरिक शीतपेयांकडे वळतायेत. नागरीकांनी विशेष काळजी घ्यावी असं आवाहन हवामान विभागानं केलंय.
जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात पारा 41 अंशावर पोहोचलाय. यात अधिक वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलीय. सध्या दुपारी कडक ऊन पडत असल्याने शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येतो. उन्हापासून बचावासाठी नागरिक टोपी, रुमाल वापरत असून थंड पेय, उसाचा रस, मठ्ठा या पदार्थांचं सेवन करताना दिसतायत.
उन्हाळ्याची चाहूल लागताच पाण्याचे माठ बाजारात दाखल झालेत. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे माठ तयार करणा-या कुंभार कारागिरांना मोठा फटका बसला होता. मात्र काही प्रमाणात कोरोना कमी झाल्याने माठ बाजारात दाखल झाले आहेत.
मुंबईत उकाडा वाढल्यावर एसी लोकलला प्रतिसाद वाढलाय. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर ११ ते १५ मार्च दरम्यान प्रत्येकी 1 हजारांहून अधिक तिकीटं विकली गेली.
कल्याण डोंबिवलीमध्येही उन्हाचा पारा 41 च्या आसपास गेल्यानं अंगाची लाहीलाही होतेय. दुपारच्या सुमारास उन्हाच्या झळा आणखीन तीव्र झाल्याने सरबत,ताक,लस्सीच्या गाड्यांवर नागरिकांची गर्दी वाढू लागलीय. एरवी फुल्ल असलेली खेळाची मैदानंही ओस पडू लागली आहेत.
पुणे जिल्ह्याच्या शिरूर आंबेगाव खेड जुन्नर परिसरातील ग्रामीण भागात प्रचंड उष्णतेमुळे नागरिक हैराण झालेत. दुपारच्या वेळी नागरिक घरात बसणंच पसंत करतायत. उष्णतेपासून बचावासाठी थंड शीतपेयांचा आधार घेतला जातोय.
राज्यात सध्या तापमानाचा पारा प्रचंड वाढला आहे.अशा परिस्थितीत शेती पिकांना पाण्याचा फटका बसू नये यासाठी भामा-आसखेड धरणातून भामा नदीत पात्रात पहिलं आवर्तन सोडण्यात आलं. 500 क्युसेक्सने हा पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणात सध्या 74.89% टक्के पाणीसाठा शिल्लक असून, कांदा पिकाला या आवर्तनाचा फायदा होणार आहे.