Harshvardhan Patil On What Happened In Silver Qak Meeting: शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याची घोषणा भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे. या पक्षप्रवेशाआधी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यामध्ये हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर झालेल्या बैठकीचा संदर्भ दिला. शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनी आमच्या पक्षात या असा आग्रह धरला. आमच्या कार्यकर्त्यांनाही निवडणूक लढवायची असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जावं. आम्हा सर्व कार्यकर्त्यांचा पाठिंबा आहे, असं म्हणत हर्षवर्धन पाटील यांनी निर्णय जाहीर केला आहे.
"देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली त्यामध्ये त्यांनी काही प्रस्ताव ठेवले होते. त्यांनी मांडलेले भूमिकेवर दोन महिन्यापासून चर्चा सुरु होती. कार्यकर्त्यांनी माझ्याकडे केलेला आग्रहाबद्दल देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. माझ्या कार्यकर्त्यांनी खूप त्रास, अन्याय सहन केला आहे. तो माझा व्यक्तिगत निर्णय होईल अशी चर्चा झाल्यानंतर माझ्या अडचणी तुम्ही समजून घ्या म्हणालो आणि नंतर शरद पवार यांच्याशी चर्चा केली," असं हर्षवर्धन पाटील पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले.
"1952 साली शंकरराव पाटील यांना बोलावून पंडित नेहरू यांनी तिकीट दिलं. त्यापुढे जे जे निर्णय झाले ते जनतेच्या आग्रहाखातर झाले. इंदापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी निर्णय झाले. 1995 ला तुम्ही आग्रह धरला की बंडखोरी करावी लागेल. ती स्वीकारली आणि विधानसभेत पाठवण्याचा इतिहास घडवला. 2014 चा काँग्रेसचा देखील आग्रह तुम्ही (कार्यकर्त्यांनी) धरला. 2019 ला भाजपचा निर्णय तुमच्या आग्रहाखातर घेतला. ती निवडणूक जिंकता जिंकता हरलो. तालुका 10-20 वर्षे मागे गेला. लोकशाहीत जनता श्रेष्ठ आहे," असं हर्षवर्धन पाटील म्हणाले.
"आपल्याला काही बोलायचं नाही, टीका करायची नाही. आपल्याला विजय मिळवायचा आहे. कार्यकर्त्यांनी संयमाने घ्यावे. शरद पवार आणि आपले व्यक्तिगत कुटुंबाचे संबंध आहेत. आपण कधीही टोकाचे भूमिका घेतली नाही कारण आपण संस्कारातून घडलो आहे. आपल्याला परिवर्तन करायचे आहे. येणाऱ्या पुढच्या काळामध्ये इंदापूर तालुक्याचा राजकीय वनवास राहणार नाही," असा विश्वास हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला. "त्यांच्या (शरद पवारांच्या) पक्षात प्रवेश करणे हाच आपला रोल आहे पुढचं काही बोलण्याचा अधिकार आपल्याला नाही," असं हर्षवर्धन पाटील म्हणाले.
"सिल्व्हर ओक'वरुन येण्याचा निरोप आला. काल दीड तास सविस्तर चर्चा झाली यावेळी खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या होत्या. कार्यकर्त्यांबरोबरच शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी मला राष्ट्रवादीमध्ये येण्याचा आग्रह धरला. आपण राष्ट्रवादी काँगेस शरदचंद्र पवार पक्षात यावे असं मला सांगण्यात आलं. त्यामुळे आपण हा निर्णय घेत असून मी घोषीत आणि जाहीर करतो की राष्ट्रवादी काँगेस शरदचंद्र पवार पक्षात जाण्याचा निर्णय घेत आहे," असं हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. "हे जाहीर करत असताना आज जनतेची भूमिका महत्त्वाची आहे. त्यांच्या आग्रहाने हा निर्णय घेतला आहे. शंकरराव पाटील राजेंद्रकुमार घोलप यांनी विचाराचे राजकारण केले. शरद पवार आणि आमचे कौटुंबिक संबंध आहेत. ही भूमिका जनतेची आहे ती जाहीर करतो," असं हर्षवर्धन पाटील म्हणाले. भाजपाचा राजीनामा दिल्याचंही त्यांनी सांगितलं. भाजपने कोणता दुसरा प्रस्ताव होता का यावर नो कॉमेंट्स अशी प्रतिक्रिया हर्षवर्धन यांनी नोंदवली. तसेच शांत झोप लागते का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता त्यावरही हर्षवर्धन पाटील यांनी, 'नो कॉमेंट्स' असं उत्तर दिलं.
यापूर्वी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना हर्षवर्धन पाटील यांनी पवारांबरोबरच बैठकीत काय झालं याची माहिती दिली. "राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी 'सिल्व्हर ओक'ला बोलवलं बैठक झाली. सविस्तर चर्चा झाली. तालुक्यातील बऱ्याच लोकांचा आग्रह आहे तुम्ही विधानसभेचे निवडणूक लढवा. तुम्ही भाजपमध्ये आहात तुमच्या जनतेचा आग्रह असेल तर तुम्ही निर्णय घ्या. तुम्ही निर्णय घेतल्यानंतर बाकीच्या गोष्टीची जबाबदारी माझी राहील, असं शरद पवार म्हणाल्याचं हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं आहे. हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थित समर्थकांना प्रश्न विचारला, तुम्हाला प्रवेश करायचा आहे की नाही? त्यावर समर्थकांनी होय असं एका सूरात उत्तर दिलं. "मलाही राम कृष्ण हरी वाजवा तुतारी असा आवाज आला," असं हर्षवर्धन पाटील म्हणाले.