रत्नागिरीत : ज्ञानदा पोळेकर मृत्यूप्रकरणी तीन डॉक्टरांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.पावसकर दाम्पत्यासह अन्य एका डॉक्टरचा यात समावेश आहे. प्रसुती काळानंतर उपचारादरम्यान डॉक्टरांनी केलेल्या हलगर्जीपणामुळे ज्ञानदाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांनी कारवाई करत डॉक्टरांवर गुन्हा दाखल केलाय.
ज्ञानदा यांचा प्रसुतीनंतर केवळ सहा दिवसांत मृत्यू झालाय. पदरात केवळ सहा दिवसांचे बाळ असलेल्या या बाळंतीण मृत्यूप्रकरणी पावसकर हॉस्पिटलवर परवाना निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.
बाळंतीण ज्ञानदा पोळेकर यांचा मृत्यू झाला. रत्नागिरी शहरातल्या पावसकर हॉस्पिटलमध्ये त्यांची सीझर डिलिव्हरी झाली होती. तीन दिवसांनी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मात्र शनिवारी अस्वस्थ वाटू लागल्यानं त्यांना पुन्हा पावसकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र त्यावेळी तिथं एकही डॉक्टर उपस्थित नव्हता.
हे हॉस्पिटल चालवणारे पावसकर दाम्पत्य शहराबाहेर होते. तरीही ज्ञानदा यांना रुग्णालयात दाखल करुन घेण्यात आले. मात्र पुढच्या आठ तासानंतरही त्यांना तपासायला एकही डॉक्टर आला नाही. त्यामुळे रविवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला.