सातारा शहराची हद्द वाढ करण्याचा निर्णय, आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या पाठपुराव्याला यश

सातारा शहराची हद्द वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. 

Updated: Sep 8, 2020, 11:18 AM IST
सातारा शहराची हद्द वाढ करण्याचा निर्णय, आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या पाठपुराव्याला यश title=

दीपक भातुसे, मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासूनच्या मागणीला आज अखेर यश मिळालं आहे. सातारा शहराची हद्द वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. अनेक वर्ष हा विषय प्रलंबित होता. बराच पाठपुरावा केल्यानंतर आज त्याबाबतचा निर्णय झाला. सातारा महानगरपालिका होण्यासाठी याचा मोठा फायदा होणार आहे. शहरा लगतच्या भागात यामुळे विकास करता येईल. तसेच शहराच्या उत्पन्नातही यामुळे भर पडणार आहे.

सातारा अ वर्ग नगरपालिका आहे. आता राष्ट्रीय महामार्गाचा पश्चिम भाग पकडून हद्द वाढ केली गेली आहे. वेण्णा नदीपर्यंत ही हद्द वाढ करण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे सातारचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी या हद्दवाढीसाठी सरकारकडे पाठपुरावा केला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर अखेर या मागणीला यश आलं. विशेष म्हणजे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे वडील माजी मंत्री दिवंगत अभयसिंहराजे भोसले यांनी आपल्या कार्यकाळात सातारा शहराच्या हद्दवाढीची मागणी लावून धरली होती.

सातारा पालिकेची स्थापना १८५१ मध्ये झाली होती. त्यानंतर १८८२ मध्ये गोडोली, सदरबझार व कॅम्प परिसरातील लहान नगरपालिकांची (सबअर्बन म्युन्सिपल) स्थापना झाली. १९६८ मध्ये सातारा पालिकेचा विस्तार होत हा भाग सातारा पालिकेत समाविष्ठ झाला. मात्र, त्यानंतर साताऱ्याची हद्दवाढ झालेली नव्हती. १९७७ मध्ये हद्दवाढ प्रस्तावित करण्यात आली. त्यानंतर हद्दवाढीबाबत अनेकदा फेरबद्दल करण्यात आले. २२ मार्च २०१७ रोजी चौथ्यांदा हद्दवाढीची अधिसूचना काढण्यात आली होती. 

सातारा हद्दवाढीबाबतचा प्रस्ताव तब्बल 42 वर्षांपासून दिला गेला होता. शाहूनगर, जगतापवाडी, शाहूपुरी बाजूकडील काही भागाचा यामुळे विकास खुंटला होता. शिवेंद्रसिंहराजेंनी सातत्याने सातारा शहराच्या हद्दवाढीच्या बाजूने भूमिका घेतली होती.