यवतमाळ : यवतमाळच्या सरकारी महाविद्यालयात एक धक्कादायक घटना घडली आहे. श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात एका डॉक्टरची निर्घुण हत्या करण्यात आली आहे. डॉक्टरच्या या हत्येमुळे एकच वैद्यकीय महाविद्यालय आणि आजूबाजूच्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
बुधवारी रात्रीच्या सुमारास वैद्यकीय महाविद्यालयातील आणि मूळचा ठाण्याचा असलेला रहिवासी डॉक्टर अशोक पाल याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. धारदार शस्त्राने त्याची हत्या करण्यात आली. हा खून नेमका कुणी आणि का केला याबाबत अजून माहिती मिळालेली नाही. मात्र या घटनेमुळे संपूर्ण विद्यार्थी संतप्त झालेत.
दरम्यान या घटनेमुळे रूग्णालयातील निवासी डॉक्टरांनी बेमुदत संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. याचा परिणाम रूग्णसेवेवर होणार आहे. या संपामुळे जिल्हा शासकीय रूग्णालयात वैद्यकीय सुविधा मिळणार नाहीत. या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे अधिष्ठाता आणि पोलीस प्रशासन यांच्या निष्काळजीपणामुळेच महाविद्यालय परिसरात हा खून झाल्याचा आरोप केला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात पुरेशी प्रकाश व्यवस्था नाही, सुरक्षेच्या दृष्टीने कुठल्याही उपाययोजना नाहीत, सीसीटीव्ही आणि सुरक्षारक्षक नाहीत. त्याचप्रमाणे विद्यार्थिनींच्या वसतिगृहाला देखील सुरक्षा भिंत नाही. त्यामुळे एकूणच या परिसरात समाजकंटकांचा वावर असतो, याबाबत पालकमंत्री, स्थानिक लोकप्रतिनिधी, महाविद्यालय प्रशासनाला आणि पोलिसांना वारंवार सूचना करून देखील कुठलीही उपायोजना केली गेली नसल्यामुळेच वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी आणि डॉक्टर असुरक्षित आहेत.
यापूर्वी देखील महाविद्यालयात अशा घटना घडल्या आहेत, त्यामुळे खुणाच्या घटनेसाठी संबंधित प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. मारेकऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाईची मागणी देखील विद्यार्थ्यांनी केली.